जगभरातील मुस्लिमांना झकरबर्गचा पाठिंबा

माझ्या आई-वडिलांनी मला इतर कोणत्याही धर्माच्या लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात उभं राहायला शिकवलं

Mark Zuckerberg Support to Muslim,जगभरातील मुस्लिमांना झकरबर्गचा पाठिंबा
झकरबर्गने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मुस्लिमांच्या समर्थनार्थ एक पोस्ट अपलोड केली

पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरात मुस्लिमांविरोधात वाढत चाललेला असंतोष आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत मुस्लिमांना प्रवेशबंदीची केलेली मागणी, या सर्व गोष्टींना फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने विरोध दर्शवला आहे. झकरबर्गने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मुस्लिमांच्या समर्थनार्थ एक पोस्ट अपलोड केली आहे.
मार्क म्हणतो, मी जगभरातील आणि फेसबुकवर असलेल्या सर्व मुस्लिम नागरिकांचे समर्थन करतो. पॅरिस हल्ला व या आठवड्यात व्यक्त झालेल्या द्वेषाच्या भावनेनंतर इतरांच्या कृत्यांमुळे मुस्लिमांना  रोष व तिरस्कार सहन करावा लागत असून, त्यांना किती भीती वाटत असेल याची मी केवळ कल्पनाच करू शकतो. एक ज्यू म्हणून माझ्या आई-वडिलांनी मला इतर कोणत्याही धर्माच्या लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात उभं राहायला शिकवलं आहे.
फेसबुकचा प्रमुख या नात्याने मी मुस्लिम नागरिकांना सांगू इच्छितो, की या मंचावर आपले कायम स्वागतच असेल. मी तुमच्या हक्कांसाठी नेहमी लढा देईन आणि तुमच्यासाठी सुरक्षित व शांतीचं वातावरण तयार व्हावं यासाठी प्रयत्न करेन. आपण आशा सोडता कामा नये, एकत्र राहून एकमेकांतील चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या तर आपण नक्कीच चांगलं जग निर्माण करू शकतो.

दरम्यान, मुस्लिमांना अमेरिकेत येण्यास प्रतिबंध करण्यात यावा, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले होते. कॅलिफोर्नियातील हत्याकांडानंतर त्यांनी हे वक्तव्य केले असून त्यांच्या अध्यक्षीय प्रचारातील हे सर्वात प्रक्षोभक विधान मानले जात आहे. विरोधकांनी केलेल्या टीकेनंतरही आपल्या मुस्लिमांविषयीच्या वक्तव्यावर डोनाल्ड ट्रम्प ठाम आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mark zuckerberg statement in support of american muslims

ताज्या बातम्या