चीनमधील करोनाची साथ आटोक्यात येत असताना इतर देशात करोना पसरल्याने त्या संधीचा फायदा घेत चिनने आता बहुतांश कारखान्यात मास्क तयार करण्याचे काम सुरू केले असून त्यातून बक्कळ पैसा कमावण्याचा त्यांचा इरादा आहे.

ईशान्य चीनमध्ये पाच ठिकाणी एन ९५ मास्क तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून चीनमध्ये साथ फेब्रुवारीमध्ये जोरात असताना ग्वान शिनझे यांच्या कंपनीने मास्कचा नवा कारखाना सुरू केला होता. आता तर या ३४ वर्षीय व्यक्तीचा मास्कचा धंदा बरकतीत आला असून त्यांनी इटलीसह अनेक देशात मास्क पाठवणे सुरू केले आहे.

पहिल्या दोन महिन्यातच चीनमध्ये ८९५० उत्पादकांनी मास्कची निर्मिती सुरू केली होती. हुबेई व वुहाननंतर करोना विषाणू इटली, अमेरिका, स्पेन, ब्रिटन या देशात पसरला असून आता त्या संधीचा फायदा त्यांनी घेतला आहे. एन ९५ मास्क तयार करणाऱ्या डोंगग्वान शहरातील कंपनीचे व्यवस्थापक शी शिनहुई यांनी सांगितले की, मास्कच्या माध्यमातून आता आम्ही  भरपूर पैसा कमावणार आहोत. पूर्वी या धंद्यात कमी नफा होता आता भरपूर नफा होत आहे. रोज ६० ते ७० हजार मास्क आम्ही तयार करीत आहोत.

क्वी ग्वांगटू यांनी सांगितले की, आम्ही मास्क तयार करण्याच्या यंत्रणेत ७ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. २५ जानेवारीपासून आम्ही मास्कची निर्मिती करीत आहोत. आम्ही सत्तर जीवरक्षक उपकरणे प्रत्येकी ७१ हजार डॉलर्सला विकली आहेत. अजून १४ दशलक्ष डॉलर्सच्या उपकरणांची मागणी हातात आहे.

मूळ उद्योग सोडून मास्क निर्मिती

झेजियांगमध्ये वेनझाऊच्या एकाने कापड  निर्मितीचा मूळ उद्योग सोडून मास्क निर्मिती सुरू केली आहे. मास्कसाठी जे कापड लागते त्याच्या किमती टनाला १० हजार युआन वरून चार लाख ८० हजार युआन झाल्या आहेत. चीनमधून सध्या १० लाख मास्क इटलीला पाठवले जात आहे. दक्षिण कोरियातूनही त्याला मोठी मागणी आहे. चीनमधील डोंगग्वान हे मास्कचे जगातील मोठे उत्पादन केंद्र ठरले आहे.