लॉकडाउनमुळे घराकडे परतणाऱ्या मजुराच्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची अजून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. मुंबईहून रिक्षातून उत्तर प्रदेशच्या जौनपूर इथे आपल्या घराकडे निघालेल्या या कुटुंबावर मंगळवारी सकाळी काळाने घाला घातला. तब्बल १५०० किमीचा प्रवास पूर्ण केल्यानंतर घरापासून अवघ्या २०० किमी अंतरावर असताना ३५ वर्षीय राजन यादव यांच्या रिक्षाचा अपघात झाला. सहा महिन्यांपूर्वीच खरेदी केलेली रिक्षा घेऊन ते तीन दिवसांपासून उत्तर प्रदेशचा प्रवास करत होते. पण, मंगळवारी सकाळी एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने रिक्षामध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी आणि चिमुकल्या मुलीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, लॉकडाउनमुळे आर्थिक तंगी होत असल्याने ३५ वर्षीय राजन यादव शनिवारी मुंबईहून रिक्षातून आपल्या कुटुंबाला घेऊन उत्तर प्रदेशकडे निघाले. ते स्वतः रिक्षा चालवत होते. तर, पत्नी (संजू, वय ३३), दोन मुलं नंदीनी (वय ६) व निखील (वय ९) आणि एक पुतण्या (आकाश, वय १६) असे सर्व रिक्षातून प्रवास करत होते. याशिवाय, त्यांच्या पत्नीचा भाऊ भोले शंकर (वय-४५) आणि राजन यांचा दुसरा पुतण्या मुकेश यादव (वय १९) हे दोघे रिक्षाच्या मागोमाग बाइकवर होते. बाइक आणि रिक्षाचा प्रवास एकत्र सुरू होता. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घर थोड्याच अंतरावर आल्यामुळे बाइकवरील नातलगांनी वेग वाढवला आणि ते घरी पोहोचले. पण, त्यानंतर थोड्याच वेळात फतेहपूर जिल्ह्याच्या खागा पोलिस स्थानकांतर्गत एका ट्रकने राजन यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यावेळी त्यांची पत्नी संजू मुलगी नंदिनीला मांडीवर घेऊन बसली होती. दोघीही रिक्षाबाहेर फेकल्या गेल्या आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने दोघींचाही जागीच मृत्यू झाला. राजन यांनी मुंबईत १३ वर्ष भाड्याने रिक्षा चालवल्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच स्वतःची रिक्षा घेतली होती.

“ट्रेनची व्यवस्था होईल याची १० दिवस वाट पाहिली. वैद्यकिय चाचणी झाली…प्रमाणपत्रही भेटलं. पण ट्रेनबाबत काहीही माहिती मिळाली नाही… अखेर शनिवारी आम्ही रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला…. गेल्या दीड महिन्यापासून माझी काहीही कमाई झालेली नव्हती. शेजारी आणि मित्रांकडून तीन हजार रुपये घऊन आम्ही निघालो होतो….सोबत रोटी आणि बटाट्याची भाजी घेतली होती… पत्नीसोबत इतक्या लांब प्रवास केल्यानंतर घराजवळ आल्यावर अपघात झाला…आता पत्नी आणि मुलीचा मृतदेह घेऊन गावात जातोय…पुन्हा मुंबईला जाईल की नाही माहिती नाही…कदाचित इथेच राहिल”, अशी प्रतिक्रिया या अपघाताचा जबर धक्का बसलेल्या राजन यांनी दिली. सुदैवाने या अपघातात राजन, त्यांचा मुलगा निखील आणि पुतण्या आकाश हे बचावले. पण, या घटनेमुळे राजन यांच्या गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी फरार ट्रक चालकाविरोधात आयपीसी कलम 279 आणि 304-अ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.