२६/११च्या हल्ल्यांत आपला पती आणि आपली मुलगी अशा दोघांनाही गमावणाऱ्या अमेरिकेतील महिलेने पाकिस्तानी अतिरेकी अजमल अमीर कसाब याच्या फाशीमुळे आपल्याला अंशत तरी न्याय मिळाल्यासारखे वाटले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नोव्हेंबर, २००८ रोजी किया श्चेर ही अमेरिकी महिला आपला पती अॅलन आणि मुलगी नाओमी यांच्यासह हॉटेल ओबेरॉय ट्रायडंट येथे उतरली होती. मात्र २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यांत अॅलन आणि नाओमी असे दोघेही ठार झाले. अॅलन याला डोक्याच्या मागच्या बाजूस गोळी घालून ठार करण्यात आले. तर नाओमी हिच्यावर अनेकदा गोळीबार केला गेला व यातच अतिरक्तस्रावाने तिचे निधन झाले.
या शहरात (मुंबईत), या वातावरणात आणि अशा हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर हल्लेखोरांना हीच शिक्षा योग्य आहे. या शिक्षेच्या अंमलबजावणीमुळे मुंबईकरांना निदान यापुढे तरी शांततेने जीवन कंठता येईल, असे श्चेर यांनी सांगितले. मात्र असे असले तरीही या शिक्षेमुळे व्यक्तिश माझे झालेले नुकसान पूर्णाशाने भरून निघणे कधीही शक्य नाही, असेही श्चेर म्हणाल्या. दरम्यान १६६ जणांचा बळी घेणाऱ्या या हल्ल्यांच्या चौथ्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येस मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाहून विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा निघणार आहे.