एकीकडे उत्तर प्रदेश पोलीस राज्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी दिवस-रात्र कारवाई करत असताना, गुन्हेगारी मात्र संपण्याचं नाव घेत नाहीये. नुकतंच देवरिया येथील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून, या व्हिडीओत चार ते पाच तरुण एका तरुणाला झाडाला बांधून पट्ट्याने आणि काठीने अमानुष मारहाण करत आहेत. इतकंच नाही तर आपल्या या अमानुष कृत्याचा ते व्हिडीओदेखील शूट करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाने काही पैसे उधार घेतले होते, हे पैसे परत न केल्यानेच धडा शिकवण्याच्या हेतूने ही मारहाण करण्यात आली.

एक आरोपी अटक, चौघांचा शोध सुरु
मारहाण करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी व्हिडीओत मारहाण करताना दिसत असलेल्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. अन्य चार आरोपींचा शोध सुरु असून, लवकरच त्यांना अटक करु अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दहशत पसरवण्यासाठी बनवला व्हिडीओ
पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी तरुणांनी गावात आपली दहशत पसरवण्याच्या हेतूने हा व्हिडीओ शूट केला आणि नंतर व्हायरल केला. पीडित तरुण कोतवालीमधील रौनियार मोहल्ल्यात राहणारा असून आपल्या वडिलांच्या दुकानात काम करतो.

अत्यंत अमानुषपणे करण्यात आली मारहाण
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत ४-५ तरुण एका तरुणाला पट्टा आणि काठीने मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे तरुणाचा खांदा तोडण्याचा प्रयत्न आरोपी करत आहेत. पीडित तरुण आरोपींकडे दयायाचना करत आहे, पण तरीही आरोपी कोणती दया दाखवत नाहीत.