कर्नाटक काँग्रेसने मंगळवारी पक्ष विरोधी कामे करणारे बंडखोर आमदार आर रोशन बेग यांना तत्काळ निलंबीत केले. यासंदर्भात कर्नाटक काँग्रेसेने काढलेल्या माध्यम परिपत्रकात म्हटले आहे की, पक्ष विरोधी कामे केल्याबद्दल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आमदार आर रोशन बेग यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावास मंजूरी दिली आहे. शिवाय यामध्ये म्हटले आहे की, त्यांना याप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीच्या आधारे पक्षातून तत्काळ निलंबीत करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुक काळात पक्षाच्या खराब कामगिरीवरून काँग्रेस नेत्यांवर टीका करत, शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार असलेल्या बेग यांनी काँग्रेसच्या ‘फ्लॉप शो’ साठी सिद्धरामय्या यांचा अहंकार आणि केपीसीसीचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांची अपरिपक्वता जबाबदार असल्याचे म्हटले होते.

या कारवाईनंतर आमदार रोशन बेग यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की मी राहुल गांधी यांच्यावर टीक केली नाही. मी अखिल भारतीय काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, सिद्धू (सिद्दरामय्या) काँग्रेसचा नाही. मी केवळ पक्षाच्या सुमार कामगिरीबद्दलच बोललो. माझ्या निलंबनासाठी सिद्धरामय्याच कारणीभूत असू शकतात.

रोशन बेग हे सात वेळा काँग्रेसचे आमदार झालेले आहेत. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते व संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना जोकर असे म्हटले होते. याशिवाय भाजपाच्या विजयानंतर रोशन बेग यांनी काँग्रेस विरोधात वक्तव्य केले होते. तसेच, अल्पसंख्यांकांनी भाजपाबरोबर जायला हवे असे देखील ते म्हणाले होते.