भ्रमणध्वनीचा क्रमांक न बदलता सेवाकर्ते बदलण्याची सुविधा येत्या फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रव्यापी होणे अपेक्षित आह़े  त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना वापरकर्त्यांना आपला भ्रमणध्वनी क्रमांक बदलण्याची आवश्यकता राहणार नाही, अशी माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री कपिल सिबल यांनी दिली़
सध्या भ्रमणध्वनी धारकाला स्थानिक क्षेत्रात आपल्या भ्रमणध्वनीचा क्रमांक न बदलता सेवाकर्ता बदलता येतो़  परंतु, राज्याबाहेरील एखाद्या ठिकाणचे स्थानिक सेवाकर्ते निवडण्याची सुविधा मात्र उपलब्ध नव्हती़  येत्या काळात ही सुविधासुद्धा उपलब्ध होणार आह़े  राष्ट्रीय दूरसंचार धोरण २०१२च्या अंमलबजावणीसाठी दूरसंचार विभागाने डिसेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ या कालावधीत विस्तृत कार्यक्रम आखला आह़े  त्यातील स्पेक्ट्रम वाटप आणि स्पेक्ट्रमच्या किमतीला मान्यता मिळणे, एकीकृत परवाना, स्पेक्ट्रम वाटपाची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणे आदी काही महत्त्वपूर्ण बाबी फेब्रुवारी २०१३मध्ये पूर्ण होणार आहेत़  त्यासोबत भ्रमणध्वनी हस्तांतरण राष्ट्रव्यापी करणे, हीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आह़े