महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे पाच मिनीटंही प्रसिद्धीशिवाय राहू शकत नाहीत. पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी या परिस्थितीत सर्व देशवासियांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं, मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. धुळे येथील सभेत बोलत असताना राहुल गांधीनी मोदींना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं.

याच सभेत बोलत असताना राहुल गांधी यांनी राफेल करारावरुन उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावरही बोचरी टीका केली. “साधं कादगाचं विमान न बनवू शकणाऱ्या कंपनीला राफेल विमानाचं कंत्राट देण्यात आलं, आणि यानंतर पंतप्रधानांच्या देखरेखीखालीच 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात गेले.” धुळ्याच्या सभेत राहुल गांधीनी राफेल विमानाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला.

पंतप्रधान मोदी यांनी कन्याकुमारी येथील निवडणूक प्रचारसभेत बोलत असताना, मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याचा संदर्भ देत काँग्रेसवर घणाघाती टीका केली. “मुंबई हल्ल्यानंतर हवाई दल पाकिस्तानावर एअर स्ट्राईक करण्याच्या तयारीत होतं, मात्र तत्कालीन युपीए सरकारने हवाई दलाला परवानगी दिली नाही. मात्र उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर आमच्या सरकारने लष्कराला कारवाईसाठी सूट दिली, आणि त्याचा परिणाम सर्वांसमोर आहेच.” त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून या दोन्ही नेत्यांमधलं शाब्दीक द्वंद्व अधिकाधीक वाढत जाईल अशी चिन्ह दिसत आहेत.