गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे विश्वासू आणि निधर्मी नेते असून, त्यांनी गुजरातचा मोठा विकास केला असल्याचे प्रशस्तीपत्र योगगुरू बाबा रामदेव यांनी मंगळवारी दिले. कालच बाबा रामदेव यांनी आपण मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
गुजरातमधील अल्पसंख्याक समाज राहणाऱया भागातही मोदी यांनी विकास घडवून आणल्याचे सांगून रामदेव म्हणाले, मोदी हे निधर्मी आहेत की धर्मवादी याबाबत त्यांना कॉंग्रेसने कोणतेही सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. मोदी हे विश्वासू असून, भाजपने स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणले पाहिजेत.
मोदी यांच्या वक्तव्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला जातो. त्यामुळे त्यांनी यापुढे जपून बोलावे, असा सल्लाही बाबा रामदेव यांनी त्यांना दिला.
आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचेही रामदेव यांनी सोमवारी सांगितले होते.