उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी संताप व्यक्त केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी एखाद्या हुकूमशहासारखे वागत असल्याची थेट टीका त्यांनी केली आहे.
उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या नऊ आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे तेथील हरिश रावत यांचे सरकार अडचणीत सापडले होते. त्यानंतर झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रविवारी उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर तरूण गोगोई यांनी संताप व्यक्त केला. मोदी यांना एखाद्या हुकूमशहासारखं देशातील प्रत्येक राज्यावर राज्य करायचे आहे. पण आम्ही आसाममध्ये तरी हे होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजपने आपले सरकारही पाडण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे माजी नेते हिमंता बिस्वा यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून तो प्रयत्न करण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.