राज्यातल्या अनेक ठिकाणी सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलेलं असताना देशाला मान्सूनचीही चाहूल लागली आहे. सध्याच्या पावसाच्या सरी या मान्सूनच्या नसल्या तरी मान्सून लवकरच दाखल होणार असल्याची चिन्हं आहेत. अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन झालं असून तसं हवामान खात्याने जाहीर केलं आहे.

monsoon-ap

हवामान खात्याने जाहीर केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार अंदमान-निकोबार बेटांवर दाखल झालेल्या मान्सूनमुळे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातल्या काही बेटांवर जोराचा किंवा अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याचबरोबर मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये अशा स्वरूपाच्या सूचनाही सरकारने दिल्या आहेत.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या ताकदीमध्ये वाढ होत असल्याचं निरीक्षण हवामान खात्याने नोंदवलं असून त्यामुळे मान्सूनची आगेकूच व्हायला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण अंदमान निकोबार द्वीपसमूह व्यापून बंगालच्या उपसागराच्या मध्य भागाकडे मान्सूनची आगेकूच होणार असल्याचं हवामान विभागाच्या या प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे.

दरवर्षी साधारण २० मे रोजी मान्सूनचा अंदमान बेटांमध्ये प्रवेश होतो. आणि १ जूनच्या सुमाराला भारतात केरळमध्ये येत भारतीय उपखंडात मान्सूनची आगेकूच होते. पण यंदा २० मे ऐवजी १४ मे रोजी मान्सूनचं आगमन अंदमान बेटांवर झाल्याने यंदा पाऊस लवकर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसंच यंदा ‘एल निनो’चा प्रभाव कमी असल्याने पाऊस चांगला पडण्याची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे.