#Moody मूडीज या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकन संस्थेने भारताच्या मानांकनात वाढ केली आहे. विशेष म्हणजे १३ वर्षांनंतर मूडीजने भारताच्या मानांकनात सुधारणा केली आहे. मूडीजने भारताचे क्रेडिट रेटिंग ‘Baa3’ वरुन ‘Baa2’ केले आहे. विरोधकांकडून मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर टीका केली जात असताना मूडीजने सरकारच्या या दोन्ही निर्णयांचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
मूडीजने भारतातील आर्थिक सुधारणा विचारात घेऊन रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे. गेल्या १३ वर्षांमध्ये मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये वाढ केली नव्हती. मात्र २००४ नंतर प्रथमच मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये सुधारणा केली. मूडीजकडून आतापर्यंत भारताला ‘Baa3’ रेटिंग देण्यात आले होते. २००४ मध्ये भारताला हे रेटिंग देण्यात आले होते. मात्र आता भारताचे रेटिंग ‘Baa2’ करण्यात आले आहे. ‘Baa3’ गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून निच्चांकी दर्जा दाखवणारे रेटिंग आहे. याआधी मूडीजकडून २०१५ मध्ये भारताचे रेटिंग ‘स्थिर’वरुन ‘सकारात्मक’ करण्यात आले होते.
‘आर्थिक सुधारणांसाठी पावले उचलण्यात आल्याने भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल सकारात्मक असेल. यामुळेच भारताचे रेटिंग वाढवण्यात आले आहे. अर्थव्यवस्थेतील सुधारणांचा फायदा बुडित खात्यात गेलेल्या कर्जांना होईल. अर्थविषयक सुधारणांमुळे देशाचा आर्थिक पाया मजबूत होईल. यामुळे सरकारी कर्जाचे ओझे हळूहळू कमी होऊ शकेल,’ असे मूडीजने म्हटले आहे. कर्जाच्या ओझ्याचा देशाच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होत असल्याचा धोक्याचा इशाराही मूडीजने दिला आहे.