भाजपकडून सोशल मीडियाचा केला जाणारा प्रभावी वापर आता सर्वपरिचित आह़े सोनिया गांधी किंवा पंतप्रधानांची टर उडविणारी टीका असो किंवा यूपीएच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची खुसखुशीत मांडणी असो, भाजप समर्थकांनी नेहमीच आघाडी घेतली आह़े  त्यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर अतिशयोक्तीपूर्ण टिप्पणी करणारे असेच एक कल्पित छायाचित्र सोशल मीडियावर गाजत आह़े  या चित्रात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा टीव्हीवर मोदी यांचे भाषण ऐकताना दाखविण्यात आले आह़े
‘ओबामासुद्धा नमोंचे भाषण ऐकतात’ अशा ओळी मंगळवारपासून सोशल मीडियावर अवतरलेल्या या चित्राखाली लिहिलेल्या आहेत़  हे छायाचित्र मूळचे २८ जानेवारी २०११ रोजी घेतलेले असून त्यात ओबामा इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक यांचे भाषण टीव्हीवर ऐकतानाचे आह़े  ते पेट डिसोझा यांनी घेतलेले असून व्हाईट हाऊसकडून ते फ्लिकर या सोशल संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले होत़े  या चित्रातील मुबारक यांचे चित्र गाळून तांत्रिक साधनांनी मोदी यांचे चित्र तेथे घालण्यात आले आह़े
इतर अनेक जणांप्रमाणे भाजपचे गुजरातमधील नवसारी येथील खासदार आणि मोदींचे कट्टर समर्थक सी़ आऱ पाटील यांनीही हे चित्र सोशल मीडियावर शेअर केले आह़े  
पाटील यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘ते चित्र माझ्या फेसबुक पानावर आले होत़े  मी कोणतीही तपासणी न करता ते शेअर केल़े  हे भाजपच्या विरोधकांचेच काम असले पाहिज़े  भाजपचे समर्थक हे चित्र तयार करून अपकीर्ती कशाला करून घेतील़  मी याबाबत अधिक माहिती शोधत आह़े ’