राज्यसभेत गोंधळ, आरोप प्रत्यारोप, विरोधकांवर टिकाटिप्पणी सुरू असते पण याहूनही पलीकडे नाट्यपूर्ण घटना सोमवारी घडली. एका महिला खासदाराला बोलता बोलता रडू कोसळले. अण्णा द्रमुकच्या खासदार शशीकला पुष्पा यांनी आपल्या जीवाला धोका असून पक्षश्रेष्ठीकडून आपल्याला राजीनामा देण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचा  आरोप केला. तामिळनाडूत आपण सुरक्षित नसून, जीवाला धोका असल्याने आपल्याला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी राज्यसभेत केली आणि हे सांगताना त्यांना आपले अश्रू आवरता आले नाही. त्यामुळे महिला खासदाराच्या राज्यसभेत रडण्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले तर दुसरीकडे त्यांची पक्षाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी पक्षातून हाकलपट्टी करण्यात येत असल्याचे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी जाहीर केले.
द्रमुकचे खासदार तिरूची सिवा यांच्या श्रीमुखात भडकवल्यामुळे शनिवारपासूनच त्या वादाच्या भोव-यात सापडल्या होता. दिल्ली विमानतळावर त्यांचे तिरूची सिवा यांच्यासोबत वाद झाले आणि या वादातून त्यांनी सिवा यांच्या कानाखाली लगावली होती. यावेळी राज्यसभेत बोलताना त्यांना अण्णा द्रमुकच्या प्रमुख आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता या राजीनामा देण्यासाठी दबाव आणत असून त्यांनी आपल्याही श्रीमुखात लगावली होती, असा आरोप केला. सिवा यांनी अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केले त्यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले, तसेच सुरक्षेची मागणीही त्यांनी केली. तेव्हा ही मागणी लेखी स्वरूपात सभापतीकडे देण्यात यावी असेही त्यांना सांगण्यात आले.