बेनीप्रसाद वर्मा हे ज्या पद्धतीने बोलत आहेत ती काही काँग्रेसची संस्कृती नाही. त्यामुळे त्यांनी प्रथम सभ्यता पाळायला शिकले पाहिजे, असा सल्ला समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी शुक्रवारी येथे दिला.
बेनीप्रसाद यांच्याबद्दल मी काय बोलणार? माझे जुने सहकारी माझ्याशी चर्चा करतात हेच पुष्कळ आहे. ते जे काही बोलत आहेत ते सकारात्मक असो की नकारात्मक.. किमान ते बोलत असतात. त्यामुळे माझे नुकसान ते काय होणार, अशी विचारणा मुलायमसिंह यादव यांनी केली. बेनीप्रसाद यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना बेनीप्रसाद यांनी प्रथम सभ्यता शिकावी, असा सल्ला मुलायमसिंह यांनी दिला. बेनीप्रसाद यांच्या पक्षाने त्यांची हजेरी घेतली आहे, याकडे लक्ष वेधले असता त्यांना पक्षत्याग करावा लागेल अशा पद्धतीने ते का बोलले, याचा विचार केला पाहिजे, असे मत मुलायमसिंह यांनी मांडले. बाबरी मशीद पाडण्यात भाजपसमवेत मुलायमसिंह यादव यांचाही हात होता, या बेनीप्रसाद यांच्या आरोपाबद्दल बोलताना यासंदर्भात चौकशी करण्यास सरकार मोकळे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.