केस सरळ करण्याच्या सौंदर्य उपचारानंतर (हेअर स्ट्रेटनिंग) केस गळती वाढली त्यामुळे निराश झालेल्या एका विद्यार्थिनीने आपले आयुष्य संपवले आहे. म्हैसूर येथे बीबीएचे शिक्षण घेणाऱ्या नेहा गंगम्मा या मुलीने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. तरूणीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर या ठिकाणच्या स्थानिक ब्युटी पार्लर विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

नेहा गंगम्मा या तरूणीने काही दिवसांपूर्वीच म्हैसूरमध्ये हेअर स्ट्रेटनिंग करून घेतलं होतं. मात्र हेअर स्ट्रेटनिंगनंतर तिचे केस गळण्यास सुरूवात झाली. ज्यामुळे एक दिवस आपल्याला टक्कल पडेल या भीतीने तिला ग्रासले. तसेच रोजच या समस्येला सामोरे जावे लागल्याने तिला नैराश्य आले. या नैराश्यातूनच तिने आत्महत्या केली असे तिच्या पालकांनी म्हटले आहे.

माझे केस विरळ होत आहेत त्यामुळे मला कॉलेजला जाण्याची इच्छा नाही असे माझ्या मुलीने मला सांगितले असे या मुलीच्या आईने म्हटले आहे. तसेच हेअर स्ट्रेटनिंगनंतर आपल्या त्वचेला इजा झाली आहे असेही नेहा म्हटली होती. कॉलेजमध्ये गेलो तर मैत्रिणी याबाबत प्रश्न विचारून भंडावून सोडतील, मित्रही टिंगल करतील अशीही भीती आपल्याला वाटते आहे असेही नेहाने सांगितलेल्या तिच्या आईने स्पष्ट केले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

नेहा म्हैसूरमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहात होती. २८ ऑगस्टपासून ती बेपत्ता झाली. ज्यानंतर घर मालकांनी नेहा घरी आली नसल्याचे तिच्या पालकांना कळवले. पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तिचा शोध सुरू होता, मात्र १ सप्टेंबरला नेहाचा मृतदेह लक्ष्मणतीर्थ नदीत सापडला.