राज्यसभेची उमेदवारी न दिल्याच्या कारणावरून नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलातील(जेडीयू) एन.के. सिंग शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नितीशकुमार यांच्याकडून राज्यसभेसाठी उमेदवारी नाकारताना देण्यात आलेल्या वागणुकीमुळे आपण नाराज असल्याचे सिंग यांनी सांगितले. तसेच भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर आपले अस्तित्व टिकविण्याच्या नादात नितीशकुमारांचे विकासाकडे दुर्लक्ष झाल्याची टीकासुद्धा त्यांनी केली. केंद्राकडून बिहार राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी नितीशकुमारांच्या बरोबरीने आपण आघाडीवर असल्याचेसुद्धा एन.के. सिगं यांनी स्पष्ट केले. आपण जेडीयू पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असून यासंबंधी स्पष्टीकरण देणारे एक पत्रसुद्धा मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पाठविल्याची माहिती सिंग यांनी दिली आहे. एन.के. सिंग यांनी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर बिहारची प्रतिमा सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले असून त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला निश्चितच फायदा होईल असे भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी सांगितले.