बुधवारी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. त्याचा भाजपामधील प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आताचा काँग्रेस पक्ष हा पूर्वीसारखा राहिला नसल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसच्या एकंदरीत परिस्थितीवरून आता त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. सुमारे वर्षभरापूर्वी अगदीच काठावरच्या बहुमताच्या जोरावर मध्यप्रदेशात कॉंग्रेसचे सरकार स्थापनेवेळी नेतृत्व निवड करताना झालेली चूक भोवण्यास एव्हाना सुरुवात झाली आहे. एकेका राज्यातली सत्ता हातून निसटण्याची परिस्थिती असतानाही, सत्तेचे केंद्र गांधी घराण्याच्या अंगणाबाहेर जाऊ न देण्याच्या धोरणाचे परिणाम हळूहळू समोर येऊ लागले आहेत, असं म्हणत संघ विचारांच्या नागपूर तरुण भारतमधून काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे.

अजून निदान दोन-तीन दशकांचे राजकीय भवितव्य ज्यांना आहे, त्या जोतिरादित्य शिंदेंचे मध्यप्रदेशातील मागील निवडणुकीतले योगदान, त्यांनी जागोजागी घेतलेल्या प्रचारसभा, त्यायोगे ताकदवान सत्ताधार्‍यांकडून सत्ता खेचून आणण्यात तिथे कॉंग्रेसला आलेले यश, आदी सार्‍या बाबी बाजूला ठेवून कमलनाथांना सत्ताशकट सोपविण्याची भूमिका खरंतर त्याच वेळी अनाकलनीय ठरली होती. पण, सत्तेपुढे शहाणपण चालत असते कुठे? त्यात, कॉंग्रेसमध्ये तर काय, ‘गांधीं’पुढे लोटांगणं घालण्याची परंपराच आहे. आडनाव ‘गांधी’ असणे महत्त्वाचे. मग ‘राहुल’ नावाचा नेताही राष्ट्रीय अध्यक्ष होण्यास ‘पात्र’ ठरतो. अन्यथा तसे घडलेच कधी नाइलाजाने, तर त्यांचा कधी सीताराम केसरी, कधी नरिंसह राव, तर कधी मनमोहन सिंग करण्यात पटाईत आहे तिथली ‘चौकडी.’ असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीकेचा बाण सोडला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?
एक काळ होता, या पक्षाकडे संपूर्ण देशभराची सत्ता होती. ताकद होती. विरोधात उभे ठाकण्याची कुणाची हिंमत नव्हती. पक्षातही नेहरू, गांधींच्या शब्दापलीकडे जाण्याचे धारिष्ट्य कुणाला होत नव्हते. सत्तेच्या शक्तीपुढे होणारे शहाणपणाचे खच्चीकरण सहज खपून जायचे. बर्‍याचदा त्याचीच वाहवा व्हायची हुजरेगिरी करणार्‍यांच्या गर्दीत. क्षमता आणि लायकीपेक्षाही परंपरेने पदरी पडलेल्या पदाची शान या दोन्ही नेत्यांच्या नंतरच्या पिढीला सांभाळता आली नाही. ना राजीव, ना सोनियांना. राहुल गांधींनी पदरी पडलेल्या संधीचे कसे वाटोळे केले, त्याचा इतिहास विस्मरणात गेलेला नाही अद्याप कुणाच्याच. राहुलला जमले नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिल्यावरही सत्तेची सूत्रं सोनियांच्या हाती राहतील याचीच तजवीज झाल्याने, हंगामी अध्यक्षाच्या नेतृत्वात कार्यभार हाकला जात राहण्याची वेळ, शतकाहून अधिक काळाचा इतिहास लाभलेल्या एका राष्ट्रीय पक्षाच्या वाट्याला आला आहे. पण, यातून बोध घेईल तो कॉंग्रेस पक्ष कसला!

मध्यप्रदेशात ज्योतिरादित्यांनी थेट पक्षनेतृत्वाला आव्हान देत, त्याच्या कार्यप्रणालीबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त करीत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना धड पक्ष चालवता येत नाही, जे त्यांच्या विचित्र वागणुकीमुळे विनोदाचा विषय ठरलेत, ज्यांना कवडीचा जनाधार नाही ते ‘राष्ट्रीय’ स्तरावर नेतृत्व करताहेत अन्‌ ज्यांना लोकमानसात स्थान आहे, ज्यांच्या सभांना गर्दी होते, ज्यांच्यात पक्षाला विजय मिळवून देण्याची ताकद आहे, त्यांना मात्र बाजूला खितपत ठेवण्याचे धोरण कॉंग्रेसच्या अंगलट येऊ लागले आहे.

मध्यप्रदेशातील सध्याच्या राजकीय घडामोडींचे पडसाद नजीकच्या काळात कसे उमटतात, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्यातरी त्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांची भूमिका पडत्या काळातही संघर्ष करण्याची दिसते आहे. बहुधा म्हणूनच की काय, पण सरकार कोसळण्याच्या स्थितीत असतानाही त्यांचे मुजोरीने वागणे चालले आहे.