करोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे देशभर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक झाले आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे लसीचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे लस वाया जाण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. दरम्यान, केरळमध्ये आरोग्य कर्मचारी लसीबाबत सतर्क झाले आहेत. लस वाया जाता कामा नये म्हणून काळजी घेत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ट्वीट करत माहिती दिली की, “केरळला भारत सरकारकडून लसीचे, ७३,३८,८०६ डोस मिळाले आहेत. आम्ही प्रत्येक कुपीतील उरलेले अतिरिक्त डोस वापरुन, ७४,२६,१६४ डोस दिले आहेत. आमचे आरोग्य कर्मचारी, विशेषत: परिचारिका खूप प्रभावी आहेत आणि कौतुक करण्यास पात्र आहेत”.

केरळच्या मुख्यमंत्र्यांचे लसीवरील ट्वीट पुन्हा रीट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले “हे लक्षात घेणे चांगले आहे की आमच्या आरोग्य कर्मचारी आणि परिचारिकांनी लस वाया जाण्यापासून वाचवत एक उदाहरण ठेवले आहे.”

“कोविड -१९ विरूद्ध लढा मजबूत करण्यासाठी लस वाया जाण्यापासून वाचवणे महत्वाचे आहे”, असे देखील नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

देशातली रुग्णसंख्या तीन लाखांच्या घरात

देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसांत नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या आसपासच आहे. आज सकाळी पूर्ण झालेल्या २४ तासात देशात ३ लाख ८२ हजार ३१५ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.