लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी सोनिया गांधी यांचे कुटुंब संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याचा आरोप पंतप्रधनान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यामुळे गरिबांसाठी लाभदायक अशी अनेक विधेयके प्रलंबित असल्याचा ठपका पंतप्रधानांनी गांधी कुटुंबीयांवर ठेवला.
आसाममधील चहा मळा कामगारांच्या मेळाव्याद्वारे मोदींनी प्रचाराचा नारळच फोडला. एक कुटुंब नकारात्मक राजकारण करत असून, काँग्रेसखेरीज इतर पक्षांना संसदेचे कामकाज सुरळीत चालावे असे वाटते. लोकसभेत ४०० वरून ४० पर्यंत खाली घसरण झाल्याने त्यांनी मोदींना काम करू द्यायचे नाही असा विडाच उचलला आहे. त्यामुळे ते मार्गात अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप पंतप्रधानांनी केला. काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवले म्हणून गरिबांवर अन्याय करून पराभवाचा सूड घेत आहेत, या आरोपाचा मोदींनी पुनरुच्चार केला. संसदेच्या गेल्या दोन अधिवेशनात काहीच कामकाज झाले नाही, त्या पाश्र्वभूमीवर मोदींनी गांधी घराण्याला लक्ष्य केले. भाजपला विरोध असूनही विरोधकांमधील अनेक नेत्यांना राज्यसभेत कामकाज व्हावे असे वाटते. मात्र एक कुटुंब पराभव झाला म्हणून, गोंधळ घालत आहे, असा आरोप मोदींनी केला.
अशा नकारात्मक राजकारणाचा देशाला फायदा होणार नाही असे पंतप्रधानांनी सांगितले. भाषणात मोदींनी वारंवार एक कुटुंब असा उल्लेख करत गांधी घराण्यावर चौफेर टीका केली. केंद्र सरकारचे ऐकणारे सरकार राज्यात आणा असे सांगत मोदींनी भाषणात आसामच्या अस्मितेचा उल्लेख केला. निधी मिळूनही आसाम सरकार प्रत्येक गोष्टीला केंद्राला जबाबदार धरत आहे.