पीटीआय, नवी दिल्ली : धोरण म्हणून सीमेपलिकडे दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर टीका करताना संकोच करू नये, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता खडसावले. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या शिखर परिषदेमध्ये ते बोलत होते. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह अन्य नेत्यांसमक्ष पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना मोदी यांनी सुनावले.

सध्या एससीओचे अध्यक्षपद भारताकडे असल्याने या शिखर परिषदेचे यजमानपद मोदी यांच्याकडे होते. यावेळी मोदी यांनी दहशतवाद आणि दशतवादाला अर्थ पुरवठय़ाची समस्या सोडवण्यासाठी निर्णायक कृती करण्याची गरज असल्याचे मत मांडले. दहशतवादाचा बिमोड करताना दुहेरी मापदंड नसावेत असेही ते म्हणाले. एससीओमधील सदस्य देशांनी आपापसातील सहकार्य वाढवतानाच परस्परांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करावा असेही मोदी यांनी चीनचे नाव न घेता नमूद केले. या शिखर परिषदेत कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि इराण या देशांचे प्रमुखही सहभागी झाले होते.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
rajnath singh
“दहशतवादी पाकिस्तानात पळाले तर त्यांना घरात घुसून ठार करू”; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचं वक्तव्य
Prime Minister Narendra Modi criticism of the India front as rumors about CAA by the opposition
‘सीएए’बाबत विरोधकांकडून अफवा; पंतप्रधान मोदी यांचे ‘इंडिया’ आघाडीवर टीकास्त्र

भारत-रशियाच्या निवेदनांमध्ये तफावत

एससीओ परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि पुतिन यांनी ३० जून रोजी दूरध्वनीद्वारे चर्चा केली होती. दोन्ही देशांनी या संभाषणाबाबत दिलेल्या निवेदनांमधील तफावत समोर आली आहे. भारताच्या ८६ शब्दांच्या निवेदनात युक्रेन युद्धावर चर्चेतून तोडगा काढण्याचा सल्ला मोदींनी दिल्याचे म्हटले आहे. तर क्रेमलिनने जारी केलेल्या १९७ शब्दांच्या निवेदनात वॅग्नर गटाच्या बंडानंतर कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याच्या पुतिन यांच्या प्रयत्नांना मोदींनी पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. आपल्या अमेरिका दौऱ्याबाबतही मोदींनी माहिती दिल्याचा दावा रशियाने केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात हे दोन्ही उल्लेख नाहीत. 

शरीफ यांचा ‘साळसूदपणा’

या परिषदेमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दहशतवादाच्या मुद्दय़ावर भाष्य केले. दहशतवाद हा बहुतोंडी राक्षस असून वैयक्तिक, संघटनात्मक किंवा सरकारी पातळीवरील दहशतवादाचा दृढनिश्चयाने सामना केला पाहिजे, असे शरीफ म्हणाले. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक फायदा घेण्यासाठी दहशतवादाच्या मुद्दय़ाचा वापर केला जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी भारताचे नाव न घेता दिला. दहशतवादाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने मोठा त्याग केल्याचा दावाही शरीफ यांनी केला.