गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेकडे व्हिसासाठी अर्ज केला, तर त्यांच्या अर्जावर तेथील इमिग्रेशन कायदा आणि धोरणाप्रमाणे नक्कीच विचार केला जाईल, असे अमेरिकेने बुधवारी स्पष्ट केले. २००२मध्ये गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींमुळे अमेरिकेने याआधी मोदी यांना व्हिसा नाकारला होता. मोदींच्या व्हिसा प्रकरणावरून सातत्याने राजकीय वर्तुळात नवनवी चर्चा झडत असते.
नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेकडे व्हिसासाठी अर्ज केला, तर त्याचा येथील इमिग्रेशन कायद्याप्रमाणे नक्कीच विचार केला जाईल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी पत्रकारांना सांगितले. व्हिसा देण्यासंदर्भात आमच्या धोरणांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणालाही व्हिसा देण्याची किंवा न देण्याची कारणे आम्ही कधीही उघड करीत नाही, याकडे साकी यांनी लक्ष वेधले.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह हे गेल्या तीन दिवसांपासून अमेरिकेच्या दौऱयावर आहेत. दौऱयामध्ये त्यांनी अमेरिकी कॉंग्रेसच्या सदस्यांची भेट घेतली. त्याच्या या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर साकी यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.