गेल्या वीस वर्षांच्या कालखंडात पृथ्वीच्या पृष्ठभागात कसे बदल होत गेले याची व्हिडिओ चित्रफीत नासाच्या वैज्ञानिकांनी तयार केली असून त्यात वेगवेगळ्या उपग्रहांनी घेतलेल्या प्रतिमांचा वापर करण्यात आला आहे.

उत्तर अर्धगोलार्धात परिसंस्था ही वसंत ऋतूत फुलतात व झाडांना नवी पालवी फुटते. उपग्रहांनी केलेल्या निरीक्षणात अनेक ठिकाणी हिरवाईही दिसून आली आहे.  महासागरांमध्ये काही सूक्ष्म वनस्पती सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेल्या पाण्याखाली फुलतात व त्यातून अब्जावधी कार्बन शोषणारे सूक्ष्म जीव तयार होतात. उपग्रहांच्या प्रकाश संवेदक यंत्रांनी या वनस्पतींच्या रंगातील बदलही टिपले आहेत. १९७० पासून अवकाशातील उपग्रह हे पृथ्वीवरील जमीन व महासागर यांचे निरीक्षण करीत आहेत. १९९७ मध्ये सी व्ह्य़ूईंग वाइड फिल्ड ऑफ व्ह्य़ू हा उपग्रह सोडण्यात आला. त्यानंतर जमीन व महासागरातील जीवनाचे सतत निरीक्षण करण्यात आले. वीस वर्षांत उपग्रहांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अ‍ॅनिमेशन फिल्म तयार करण्यात आली असून त्यात पृथ्वीवरील जीवनात वीस वर्षांत झालेला बदल दाखवण्यात आला आहे.

नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरचे जीन कार्ल फेल्डमन यांनी सांगितले की, आपल्या सजीवसृष्टीने रसरसलेल्या ग्रहावर आधारित ही चित्रफीत अविश्वसनीय आहे. आपली पृथ्वी दर दिवशी नवा श्वास भरत आहे व तेथील ऋतू महासागरी प्रवाह व तापमान हे घटक सतत बदलत आहेत. सूर्यप्रकाश व वाऱ्यांच्या प्रवाहांना पृथ्वीचा प्रतिसाद सतत बदलत आहे असे फेल्डमन यांनी सांगितले.