ह्य़ूस्टन : ‘चांद्रयान-२’शी संपर्क प्रस्थापित करण्याची मुदत जवळ येत असतानाच; भारताने चंद्रावर अवतरणाचा ज्या भागात अयशस्वी प्रयत्न केला, त्या भागाची नासाच्या मून ऑर्बिटरने छायाचित्रे टिपली असल्याचे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेतील एका प्रकल्प शास्त्रज्ञाच्या हवाल्याने एका माध्यमाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

अद्याप ज्या भागाची माहिती मिळालेली नाही, अशा चंद्रावरील दक्षिण ध्रुवाकडील भागावर अवतरणाचा ‘विक्रम’ लॅण्डरने प्रयत्न केला होता. नासाच्या ल्यूनार रिकनाईसन्स ऑर्बिटरने (एलआरओ) १७ सप्टेंबरला या भागावरून उडताना तेथील अनेक छायाचित्रे टिपली असून, ही संस्था आता या छायाचित्रांचे विश्लेषण करत आहे.

विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्याच्या शक्यतेला २१ सप्टेंबपर्यंत मुदत आहे. त्यानंतर चंद्राच्या भागावर रात्र (ल्यूनार नाईट) सुरू होणार आहे.

नासाच्या ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने ही छायाचित्रे टिपली असल्याच्या वृत्ताला एलआरओचे प्रकल्प शास्त्रज्ञ जॉन केलर यांनी दुजोरा दिल्याचे सीनेट डॉट कॉमच्या वृत्तात म्हटले आहे.

एलआरओसी चमू या नव्या छायाचित्रांचे विश्लेषण करेल आणि लॅण्डर दृष्टीस पडते की नाही (ते सावलीत असू शकते किंवा छायाचित्र घेतलेल्या भागाबाहेर असू शकते) हे पाहण्यासाठी त्यांची यापूर्वीच्या छायाचित्रांशी तुलना करेल, असे केली यांनी म्हटल्याचे या वृत्तात नमूद केले आहे.

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या (इस्रो) सांगण्यानुसार, लॅण्डर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान हे चंद्रावर उतरल्यापासून केवळ १४ दिवस कार्यरत राहणे अपेक्षित आहे.