सेरीस हा बटूग्रह असून त्याला त्याच्या साडेचार अब्ज वर्षांच्या आयुष्य काळात लघुग्रहांचे अनेक हादरे बसले असले, तरी त्याच्यावरील विवरांची संख्या आश्चर्यकारक रीत्या कमी आहे, असे नासाच्या ‘डॉन’ या अवकाशयानाने पाठवलेल्या माहितीतून दिसून आले आहे. सेरीसवर अनेक लहानमोठी विवरे आहेत पण त्यांचा व्यास २८० किलोमीटरपेक्षा अधिक नाही. सेरीसवरील गायब विवरांचे कोडे अजून सुटले नसल्याने त्यांचे संशोधन मार्चमध्ये ‘डॉन’ या सेरीसभोवती फिरणाऱ्या यानाने केले आहे. अमेरिकेतील साउथ वेस्ट रीसर्च इन्स्टिटय़ूटचे मुख्य संशोधक सिमोन मार्ची यांच्या मते सेरीसवर मोठी विवरे होती पण ती भूगर्भशास्त्रीय कारणांमुळे नष्ट झाली आहेत, कारण सेरीस या ग्रहाची उत्क्रांत अवस्था वेगळी होती. संशोधकांनी इतर घटकांचे सेरीसवरील आघात कसे असावेत याचे काही नमुना आघात तयार केले, त्यानुसार त्या ग्रहावर जास्त विवरे असायला हवी होती. त्या नमुन्यानुसार सेरीसवर ४०० कि.मी. व्यासाची १० ते १५ विवरे असावीत व १०० कि.मी. व्यासाची ४० विवरे असावीत पण डॉन अवकाशयानाने जे संशोधन केले आहे त्यानुसार तेथे १०० कि.मी. व्यासाची १६ विवरे आहेत व एकही विवर २८० कि.मी. पेक्षा जास्त व्यासाचे नाही. सेरीसच्या मूळ अवस्थेबाबत माहितीनुसार तो सौरमालेपासून फार दूर व नेपच्यूनच्या पलीकडे आहे. वैज्ञानिकांच्या मते सेरीस स्थलांतरित झाला असला, तरी तो फार उशिरा सौरमालेतील लघुग्रह पट्टय़ात गेला आहे त्यामुळे त्याच्यावर विवरे आहेत पण ती आता दिसत नाहीत.

इतके बदल झाले आहेत. मोठी विवरे नष्ट होण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया लाखो वर्षांत घडली असावी याचा शोध चालू आहे. डॉनच्या प्रतिमानुसार तेथे ८०० कि.मी. व्यासाचे प्लॅनिटी प्रकारची तीन विवरे आहेत. त्याच्या आत आणखी विवरे अलिकडे तयार झाली आहेत. ती मोठय़ा आघातामुळे बनली असावीत. सेरीसच्या अंतर्गत रचनेचा विवरांशी संबंध असावा. सेरीसच्या वरच्या भागात बर्फ आहे असे दिसून आले आहे. ते कमी दाट असल्याने स्थानशास्त्रीय पद्धतीने विचार केला, तर तेथे पृष्ठभागात क्षार असतील तर त्यांचा लवकर निचरा होतो. ओकॅटर नावाचे विवर सेरीसच्या केंद्रस्थानी असून तेथे आढळणारे क्षार हे गोठलेल्या सागराचे अंश असावेत किंवा तेथे द्रव पाणी असावे. जुन्या जलऔष्णिक क्रियेमुळे तेथील क्षार हे ऑकेटरमध्ये आले असावे. त्याचा परिणाम विवरांवर झाला असावा. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.