पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाबद्दल त्यांची प्रशंसा करून ही मोहीम भारतात, विशेषत: ग्रामीण भागात यशस्वी व्हावी म्हणून आपला पाठिंबा राहील, असे ‘युनिसेफ’ संघटनेने सोमवारी जाहीर केले.‘युनिसेफ’चे भारतातील प्रतिनिधी जॉर्जस अर्सेनॉल्ट यांनी यासंबंधी भारत सरकारचे कौतुक केले. स्वच्छतेसाठी भारताने घेतलेला पुढाकार उल्लेखनीय असून त्यासाठी आम्ही आवश्यक असेल तेथे पूर्णपणे पाठबळ देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. भारतातील अनेक जिल्ह्य़ांत विशेषत: उत्तर प्रदेशात स्वच्छतागृहे, शौचालयांची अवस्था अतिशय बिकट असल्याकडे अर्सेनॉल्ट यांनी लक्ष वेधले. सरकारच्या या पुढाकारामुळे लोकांना  परिसरात स्वच्छता ठेवण्याचे महत्त्व लक्षात येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
पाकिस्तान हवाई दलाच्या हल्ल्यात ३३ दहशतवादी ठार
इस्लामाबाद : उत्तर वझिरीस्तान आदिवासी पट्टय़ात लष्कराने तालिबान्यांविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतली असून पाकिस्तान हवाई दलाच्या विमानांनी सोमवारी केलेल्या हल्ल्यात ३३ दहशतवादी ठार झाले आहेत.अफगाणिस्तानच्या सीमेजवळ  दाता खेल परिसरात दशतवाद्यांच्या छुप्या अड्डय़ांवर पाकिस्तान हवाई दलाच्या विमानांनी बॉम्बहल्ला चढविला. त्यामध्ये ३३ दहशतवादी ठार झाले असून त्यांचे चार अड्डेही उद्ध्वस्त झाले आहेत.  जून महिन्यात लष्कराने तालिबान्यांविरोधात ‘झर्ब-ए-अझ्ब’ मोहीम हाती घेऊन कारवाई केली होती. कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या हल्ल्यात ३७ जण ठार झाल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली.
काश्मीर निवडणूक : पहिल्या टप्प्यासाठी आज अधिसूचना
जम्मू : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला आता गती मिळाली असून, मंगळवारी पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये २३ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत पाच टप्प्यांत मतदान घेण्याची घोषणा केली. २५ नोव्हेंबर आणि २, ९, १४ आणि २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी मंगळवारी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्य़ांतील १५ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर २३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
चीनमध्ये भूकंप
बीजिंग – चीनच्या युनान प्रांतातील ल्युडियान परगण्यात ४.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. भूगर्भात ११ कि.मी. खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. आतापर्यंत या भूकंपात हानी झाली नाही. युनान हा भूकंपप्रवण भाग आहे. ऑगस्टमध्ये ल्युडियानच्या ईशान्येला ६.५ रिश्टरचा भूकंप झाला होता त्यात ३ ठार व ६०० जण जखमी झाले होते. त्यानंतर जिंगजू परगण्यात ऑक्टोबरमध्ये ६.६ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता त्यात १ ठार तर ३०० जण जखमी झाले होते.
पाक लष्करप्रमुख नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत
इस्लामाबाद – पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ पुढील महिन्यात अमेरिकेला भेट देणार असून ते अमेरिकी संरक्षण अधिकाऱ्यांशी सुरक्षा प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. त्यांची ही पहिलीच अमेरिका भेट  आहे. अमेरिकेचे मार्टिन डेम्पसे यांच्या निमंत्रणावरून जनरल शरीफ तेथे जात असून ते संरक्षण मंत्री चक हॅगेल यांची भेट घेतील. अमेरिकी सैन्य  अफगाणिस्तानातून माघारी गेल्यानंतर अमेरिका-पाकिस्तान यांचे सहकार्य असावे या मुद्दय़ावर चर्चा होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान सुरक्षा व आर्थिक असा दोन्ही पातळीवर योग्य स्थितीत नसून त्याला अजूनही पाठिंब्याची गरज आहे असे पाकिस्तानचे मत आहे.
भारताचे पाकला आवाहन
इस्लामाबाद – अफगाणिस्तानला भारत लाखो टन गहू निर्यात करणार असून तो पाठवण्यासाठी पाकिस्तानने हा गहू पाकिस्तानमार्गे नेऊ द्यावा असे आवाहन भारताने केले आहे. पाकिस्तानच्या गहू उत्पादक व विक्रेत्यांना मात्र अफगाणी बाजारात भारताचा स्वस्त गहू गेल्यास गव्हाच्या पिठाच्या उद्योगात तोटा होण्याची भीती वाटत असून त्यांचा भारतीय गहू पाकिस्तानातून जाऊ देण्यास विरोध आहे. पाकिस्तानातील गहू पिठाच्या गिरण्यांचा भारताला परवानगी नाकारण्यासाठी तेथील सरकारवर दबाव आहे असे ‘डॉन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.
महिलेचा खून
रायपूर – बेमेतारा जिल्ह्य़ात एका महिलेला तिच्याच घरातील व्यक्तींनी ती काळी जादू करीत असल्याच्या संशयावरून ठार केले. या प्रकरणी एकूण १२ जणांना बंजारपूर खेडय़ातून अटक केली असून त्यात पाच महिलांचा समावेश आहे असे बेमेताराचे पोलिस अधीक्षक नरेंद्र खरे यांनी सांगितले. या दुकलहिन बाई हिचा मुलगा अशोक, दीर नकुल पटेल यांना ती घरातील मुलांवर चेटूक करीत असल्याचा संशय होता, ही महिला तिच्या मुलीच्या घरी जामुई येथे राहत होती. नंतर नकुल व त्याची पत्नी व वडिलांनी दुकलहिनबाईला बंजारपूर येथे मुलावर उपचार करण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. तिने मुलावर उपचार करण्यास नकार देताच तिला घराबाहेर ओढत लाठय़ाकाठय़ा मारल्या. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.
वीजटंचाईचा कापड उद्योगास फटका
कराची – पाकिस्तानात कापड उद्योगाला वीजटंचाईचा मोठा फटका बसला असून एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान कापडाची निर्यात १ अब्ज अमेरिकी डॉलरने कमी झाली आहे. ऑल पाकिस्तान टेक्सटाईल मिल असोसिएशनने म्हटले आहे, की सप्टेंबपर्यंत निर्यात आणखी २० कोटी डॉलरनी कमी झाली. गेल्या सहा महिन्यांत वीजटंचाई वाढली असून येत्या सहा महिन्यांत आणखी २.३ अब्ज डॉलरचा तोटा होण्याची शक्यता आहे. सुती धागे व सुती कपडे यांची निर्यात सप्टेंबपर्यंत अनुक्रमे २२ व १४ टक्के कमी झाली आहे.
दगडफेक प्रकरणी २४ जणांवर गुन्हा
मुझफ्फरनगर – उत्तर प्रदेशात शामली जिल्ह्य़ात दगडफेकीत पोलिस पथकातील सहा जणांना जखमी केल्याच्या आरोपावरून २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकारी मुकेश मलिक यांनी सांगितले, की रविवारी पोलिस पथक  एका व्यक्तीस अटक करण्यासाठी गेले असता पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यात सहा पोलिस जखमी झाले. या प्रकरणी २४ जणांवर भादंवि कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यापैकी ९ जणांची ओळख पटली आहे. दरम्यान अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
इबोलाबाबत धोरणात बदल
न्यूयॉर्क – न्यूयॉर्कमध्ये इबोला संशयित रुग्णांना २१ दिवस अनिवार्यपणे बाजूला ठेवण्याचे धोरण महापौर अँड्रय़ू क्युमो यांनी स्वीकारले होते पण त्यावर टीका झाल्याने त्यांनी आता त्यात सौम्यता आणली आहे. क्युमो यांनी जी मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली होती त्यानुसार केनेडी विमानतळावर इबोला रुग्णांची चाचणी झाल्यानंतर त्यांना २१ दिवस वेगळे ठेवण्याचा मुद्दा होता. गिनी येथून येथे आलेले डॉक्टर क्रेग स्पेन्सर यांना इबोलाचा संसर्ग झाल्याचे दिसून आल्यानंतर महापौर क्युमो यांनी कडक धोरण अवलंबले होते. त्यानुसार जर एखादी व्यक्ती इबोलाग्रस्त व्यक्तीच्या थेट संपर्कात आलेली असेल व तिला लक्षणे दिसत नसतील, तर खासगी वाहनाने न्यूयॉर्कच्या आरोग्य विभागात नेऊन एकवीस दिवस वेगळे ठेवून अचानक काही डॉक्टर तपासण्या करणार होते पण मायने येथील एक परिचारिका सिएरा लोन येथून आली होती. तिने म्हटले आहे, की या धोरणाचा फटका आपल्याला बसला असून गुन्हेगारासारखी वागणूक मिळाली आहे. कॅसी हिकॉक्स या परिचारिकेची इबोला चाचणी नकारात्मक आली होती.