लहान मुलांकडून काम करवून घेणे हाच मुळात गुन्हा असताना विविध ठिकाणी होत असलेले बालकामगारांचे शोषण हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सहकाऱ्यांकडून किंवा रोजगार देणाऱ्यांकडूनच लहान मुलांवर शारीरिक अत्याचार किंवा बलात्कार केले जाण्याचे प्रमाण गतवर्षी २५ टक्के इतके होते, असे नॅशनल क्राईम रेकॉर्डसच्या ताज्या अहवालावरून पुढे आले आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणीच या मुलांची पिळवणूक केली जाते, हे वास्तव स्पष्ट झाले.
नॅशनल क्राईम रेकॉर्डसचा गतवर्षीचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. गेल्या वर्षभरात देशात लहान मुलांवर झालेले शारीरिक अत्याचार आणि बलात्काराचे ८८०० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफसेन्स अॅक्ट’ अंतर्गत हे गुन्हे देशात विविध ठिकाणी नोंदविण्यात आले. यापैकी २२२७ प्रकरणांमध्ये कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून किंवा रोजगार देणाऱ्यांकडूनच लहान मुलांवर शारीरिक अत्याचार किंवा बलात्कार झाल्याचे अहवालात म्हटले आहे. हे प्रमाण एकूण गुन्ह्यांच्या २५.३ टक्के इतके आहे.
बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोने पहिल्यांदाच पीडित आणि आरोपी यांच्यातील नाते काय, याचीही अहवालात माहिती दिली आहे. त्यामुळेच कामाच्या ठिकाणीच लहानग्यांवर अत्याचार केले जात असल्याचे उघड झाले. दरम्यान, या अहवालानुसार देशभरात कामाच्या ठिकाणी महिलांवर झालेल्या बलात्काराचे प्रमाण हे २ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
लहान मुलांवर त्यांच्या नातलगांकडूनच शारीरिक अत्याचार किंव बलात्कार होण्याचे प्रमाण १० टक्क्यांच्या घरात आहे. एकूण प्रकरणांपैकी ९४.८ टक्के प्रकरणांमध्ये लहानग्यांवर त्यांच्या ओळखीतील व्यक्तीकडूनच शारीरिक अत्याचार केले जातात, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.