राजकीय पक्षांमधील अंतर्गत लोकशाहीवर चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. देशाच्या भविष्याच्या दृष्टीने राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत लोकशाहीची भावना प्रबळ राहणे गरजेचे असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भाजप मुख्यालयात ‘दिवाळी मिलन’ समारंभात त्यांनी माध्यमकर्मीशी संवाद साधला. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीबाबत नेहमीच चर्चा होते, मात्र त्यांची विचारसरणी, मूल्य तसेच अंतर्गत लोकशाहीबाबत फारशी चर्चा होत नाही असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

भाजपचे छोटे रूप असताना स्थानिक कार्यकर्त्यांपासून ते केंद्रीय नेतृत्वापर्यंत एकच भूमिका असायची. मात्र पक्ष विस्तारल्याने मतभिन्नता प्रकट होऊ लागल्याचे पंतप्रधानांनी मान्य केले.

स्वच्छ भारत अभियानात माध्यमांनी व्यापक प्रसिद्धी दिल्याबद्दल मोदींनी कौतुक केले. स्वच्छतेबाबत आंतरराष्ट्रीय मापदंड गाठण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागेल हे नमूद केले. संघटनेत जबाबदारी सांभाळताना पत्रकारांशी असलेल्या स्नेहाचा मोदींनी उल्लेख केला. पत्रकारांशी तेव्हा सातत्याने संवाद व्हायचा. आता माध्यमेही विस्तारली आहेत. दोघांनाही एकमेकांकडून मोठय़ा अपेक्षाही आहेत तसेच काही तक्रारी राहणारच, मात्र दोघांनी आनंदाने पुढे जायला हवे अशी पुस्ती पंतप्रधानांनी जोडली.

शहा यांची स्तुती

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या वर्षभरात देशाने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे नमूद केले.