द्रव सिमेंटचे रूपांतर द्रव धातूमध्ये करणारे एक नवीनच मिश्रण वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे. त्यामुळे सिमेंटचे रूपांतर हे अर्धवाहकात होते, त्यामुळे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्येही त्याचा वापर होऊ शकतो. पातळ फिल्म्स, संरक्षक आवरणे व संगणकाच्या चिप्स बनवण्यासाठी हे वेगळय़ा प्रकारचे सिमेंट वापरले जाऊ शकते.
जपान, फिनलंड व जर्मनीच्या वैज्ञानिकांसमवेत अरगॉन नॅशनल लॅबोरेटरीत काम करणारे अमेरिकी ऊर्जा विभागाचे भौतिकशास्त्रज्ञ ख्रिस बेनमोर यांनी सांगितले, की या नवीन पदार्थाचे अनेक उपयोग आहेत. त्यात लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेमध्ये वापरले जाणारे थिन फिल्म रेझिस्टर, संगणकाचे मॉनिटर यातही त्यांचा वापर करता येऊ शकतो.
बेनमोर व जपानच्या सिंक्रोट्रॉन रॅडिएशन रीसर्च इन्स्टिटय़ूटचे शिनजी कोहारा यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले आहे. यात त्यांनी धातुमय काचेची निर्मिती केली असून, यात पारंपरिक धातूला जसा गंज चढतो तसा चढत नाही, पारंपरिक काचेसारखी ही काच ठिसूळ नसते. सुवाहकता, चुंबकीय क्षेत्रात कमी ऊर्जा ऱ्हास, कुठलाही आकार देणे शक्य अशी त्याची वैशिष्टय़े आहेत.
यापूर्वी केवळ धातूपासून काच बनवली जात असे. आता सिमेंटपासून धातुमय काच तयार करण्यात आली आहे. यात सिमेंटमध्ये इलेक्ट्रॉन ट्रॅपिंगची प्रक्रिया घडते, जी इतरवेळी फक्त अमोनियाच्या द्रावणात घडत असते. यामुळे कक्ष तापमानाला अर्धवाहक राहू शकतील असे पदार्थ तयार करणे शक्य होणार आहे. इलेक्ट्रॉन ट्रॅपिंगने द्रव सिमेंटचे रूपांतर द्रव धातूत करण्यात आले असले तरी त्याचे स्पष्टीकरण मात्र करण्यात आलेले नाही.
अ‍ॅल्युमिना सिमेंट हे कॅल्शियम व अ‍ॅल्युमिनियमच्या ऑक्साइडपासून तयार केले जाते. मायेनाइट हा त्याचा एक घटक असतो. तो दोन हजार अंश सेल्सियस तापमानाला एरोडायनॅमिक लेव्हिटेटर व कार्बन डायॉक्साइड लेझर बीम तंत्राने गरम करण्यात आला. त्यानंतर विविध प्रकारच्या वातावरणात ऑक्सिजनचे काचेतील बंध तयार होण्याची प्रक्रिया नियंत्रित करण्यात आली. हा द्रव थंड झाल्यानंतर त्याचे काचेसारख्या अवस्थेत रूपांतर झाले. यात विद्युतवहनासाठी जशी अवस्था हवी असते तशी इलेक्ट्रॉनची अवस्था मिळवता आली. यातील लेव्हिटेशन पद्धत ही बेनमोर यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आली आहे. जेव्हा मुक्त इलेक्ट्रॉन हे काचेची निर्मिती करणाऱ्या पिंजऱ्यासारख्या बंधांमध्ये अडकून पडतात तेव्हा वाहकतेचा गुण निर्माण होतो. त्यामुळे धातूसारखीच वीजवाहकता यात आणता येते. ‘प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.