भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळात स्थान मिळाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे आगामी लोकसभा निवडणुक हेच लक्ष्य असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय असलेल्या एका नेत्याने सांगितले. मोदी यांचा भाजपच्या सर्वशक्तीमान केंद्रीय संसदीय मंडळात रविवारी समावेश करण्यात आला. त्यापार्श्वभूमीवर बोलताना या नेत्याने मोदी यांच्या भविष्यातील वाटचालीबद्दल सूचक वक्तव्य केले.
गुजरातमध्ये सलग तीनवेळा विधानसभेच्या निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने यश मिळवले. त्यानंतर त्यांची केंद्रीय संसदीय मंडळावर निवड झाली. यामुळे राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका निभावण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होईल, असे या नेत्याने म्हटले आहे. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करूनच आपली संपूर्ण टीम निवडली आहे, याकडे त्याने लक्ष वेधले.
मोदी यांच्यामुळेच अमित शाह आणि स्मृती इराणी यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाले असल्याचे या नेत्याने स्पष्ट केले.