छत्तीसगडमधील काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झालेल्या नक्षली हल्ल्याचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्यात आला आहे.
“मी मुख्यमंत्री रमण सिंग यांच्याशी घडलेल्या घटनेच्या चौकशीबद्दल बोललो आहे त्यांनी राष्ट्रीय अन्वेषण संस्था(एनआयए)द्वारे तपास करण्याचे मान्य केले आहे” असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी न्यूयॉर्क येथून दूरध्वनीवरून स्पष्ट केले. तसेच केंद्रीय गृहसचिव आर.के.सिंग यांनाही याप्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले असल्याचे शिंदेंनी सांगितले. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सुपूर्त करण्याच्या निर्णयाबद्दलची माहीती पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिली असल्याचेही ते म्हणाले.
छत्तीसगड राज्यातील निवडणूक लक्षात घेऊन काँग्रेसने शुक्रवारी परिवर्तन यात्रा काढली होती. ही यात्रा सुकमा येथे पोहोचल्यानंतर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यात महेंद्र कर्मा जागीच ठार झाले होते. तर अपहरण करण्यात आलेले छत्तीसगड काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांच्या मुलाचा मुलाचा मृतदेह शनिवारी छत्तीसगड पोलिसांना सापडला होता. या नक्षली हल्ल्यात एकूण २९ जणांचा मृत्यू झाला आहे.