शासकीय कामात अडथळे आणण्याच्या आरोपप्रकरणी एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना मेडक जिल्ह्य़ातील न्यायालयाने जामीन मंजूर केला असला, तरी द्वेषमूलक वक्तव्याप्रकरणी निझामाबाद जिल्ह्य़ातील न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. मेडकच्या अतिरिक्त आणि प्रधान न्यायमूर्तीनी अकबरुद्दीन यांना जामीन मंजूर करताना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या दोन हमी सादर करण्यास सांगितले आहे. ज्यावेळी गरज भासेल तेव्हा आपला अशील न्यायालयात हजर राहील, असे ओवेसी यांच्या वकिलांनी सोमवारी न्यायालयात स्पष्ट केले. जमिनीच्या वादातून ओवेसी यांच्यावर एप्रिल २०११ मध्ये प्रतिस्पर्धी गटाने हल्ला चढविला होता. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी परदेशात जावयाचे आहे, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला.