अतिशय उत्साहाने, गजबजलेल्या वातावरणात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचा वाढदिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. पण, त्यांच्या ६८ व्या वाढदिवसावर मात्र गडद छाया होती. अकबर रोड असो किंवा १० जनपथ, दरवर्षी वाढदिवसाचे निमित्त असले की गजबजलेले दिसते. यंदा भारतरत्न नेल्सन मंडेला यांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय सोनियांनी जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात रविवारच्या विधानसभा निवडणुकांमुळेच सुतकी वातावरण पसरलेले असल्याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
सोनिया गांधी यांनी सोमवारी ६८ व्या वर्षांत पदार्पण केले. त्यांचे निवासस्थान तसेच पक्ष कार्यालय येथे काँग्रेस समर्थक आणि अभ्यागतांपेक्षा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलीस कर्मचारी यांचीच गर्दी सोमवारी प्रामुख्याने दिसत होती. नेल्सन मंडेला यांच्या निधनामुळे देशात पाच दिवसांचा दुखवटा जाहीर केलेला असल्यामुळे, आपला वाढदिवस साजरा केला जाणार नाही, असे सोनिया यांनी रविवारी स्पष्ट केले होते. त्यामुळे वाढदिवस साजरा न करणे आणि विधानसभा निवडणुकांचे निकाल यांच्यात अर्थाअर्थी काहीही संबंध नसल्याचा दावा काँग्रेस  प्रवक्त्यांकडून वारंवार केला जात होता.
नेहमी काँग्रेसचे कार्यालय आणि सोनियांचे निवासस्थान येथे काँग्रेसचे झेंडे, बिल्ले, मफलर, स्कार्फ, दैनंदिनी, डिरेक्टरी अशा वस्तूंची विक्री करणाऱ्या ब्रिजलाल ठाकूर यांच्या मते मात्र वाढदिवस साजरा न करण्यामागे मात्र चारही राज्यांतील पराभव हेच कारण होते.