उत्तर प्रदेशच्या दादरी येथील अखलाख मोहमंद हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी केंद्राला अहवाल सादर केला. मात्र, या सरकारी अहवालात गोहत्या किंवा गोमांस सेवन अशा कोणत्याही बाबींचा उल्लेख करण्यात आलेला नाही. दोन पानांच्या या अहवालात अखलाख आणि त्यांचा मुलगा दानिश यांच्यावर ‘प्रतिबंधित पशुचे मांस’ सेवन केल्याचे आरोप आहे, एवढेच नमूद करण्यात आले आहे. परंतु गावातील लोकांच्या माहितीनूसार अखलाख आणि त्यांच्या मुलाने गोमांस सेवन केल्यामुळेच जमावाने त्यांची हत्या केली होती. त्यामुळे या सरकारी अहवालातील माहितीविषयी साशंकता उत्त्पन्न झाली आहे. या अहवालातील माहिती नजर टाकल्यास ही हत्या गोमांसाच्या वादातून झाली हे मान्य करण्यास उत्तर प्रदेश सरकार तयार नसल्याचे दिसत आहे. त्यादृष्टीने अहवालात हत्येपूर्वी निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल कोणतीही ठोस अशी माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय, पोलीस एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलेल्या अन्य गोष्टींचाही उल्लेखही अहवालामध्ये टाळण्यात आला आहे. अखलाख महमंद यांनी प्रतिबंधित पशुचे मांस सेवन केल्याच्या अफवेवरून जमाव अखलाख यांच्या घराबाहेर जमाव जमला. त्यानंतर या जमावाने अखलाख यांना ठार मारले, अशी वरवरची माहितीच या अहवालात असल्याचे गृह मंत्रालयातील सूत्रांककडून सांगण्यात आले.
दरम्यान, ही घटना घडली तेव्हा महमंद यांच्या मुलीनेही जमावाला घरात जाऊन गोमांस आहे की नाही याची खातरजमा करण्यास सांगितले होते. मात्र, हा जमाव काहीही ऐकून न घेता अखलाख यांना बेदम मारहाण करत राहिला. या मारहाणीत अखलाख यांचा मृत्यू झाला होता.