स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यास काँग्रेस पक्ष आणि यूपीए सरकारने अनुकूलता दर्शविलेली असतानाच आंध्र आणि रायलसीमा येथील मंत्री आणि खासदारांनी शनिवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन आंध्र प्रदेशच्या विभाजनाला प्रखर विरोध दर्शविला.
केंद्रीयमंत्री एम. एम. पल्लम राजू, के. एस. राव, चिरंजीवी आणि डी. पुरंदरेश्वरी, त्याचप्रमाणे खासदार बापीराजू आणि अनंतरामी रेड्डी यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेऊन आंध्र प्रदेश एकसंध ठेवण्याची मागणी केली. स्वंतत्र तेलंगणाची निर्मिती ही राज्य आणि देशाच्या हिताची नाही, असेही शिष्टमंडळाने पंतप्रधानांना सांगितले.
काँग्रेस पक्ष आणि यूपीए सरकार राज्याचे विभाजन करण्यास अनुकूल आहेत, मात्र या महिनाअखेरीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होत असून, त्यानंतर विभाजनाचा निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात विभाजनाचा निर्णय घोषित केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.