Sheikh Hasina News : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT-BD) सोमवारी मोठा निर्णय दिला आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांत शेख हसीना यांना न्यायालयाने दोषी ठरवलं असून थेट मृत्युदंडाची (फाशीची शिक्षा) शिक्षा सुनावली आहे. दरम्यान बांगलादेशमध्ये पंतप्रधान पदावरून हटवण्यात आलेल्या शेख हसीना यांनी सोमवारी ढाका न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा निषेध केला आहे. त्यांनी हा निकाल छेडछाड करण्यात आलेला, पूर्वनिर्धारित आणि कोणताही लोकशाही जनादेश नसलेल्या, एका निवडून न आलेल्या सरकारकडून आलेला असल्याचे म्हटले आहे.

बांगलादेशच्या ७८ वर्षीय माजी पंतप्रधान हसीना या त्यांना ऑगस्ट २०२४ मध्ये पदावरून हटवण्यात आल्यापासून भारतात वास्तव्य करत आहेत. शेख हसीना यांना मानवतेविरुध्द केलेल्या तीन गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. यामध्ये हिंसाचार भडकावणे, हत्येचे आदेश देणे आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील उठावाविरोधातील कारवाईदरम्यान अत्याचार रोखण्यात अपयशी ठरल्याच्या आरोपांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या उठावामुळेच हसीना यांचे बांगलादेशातील शासन संपुष्टात आले होते.

खचाखच भरलेल्या ढाका न्यायालयात न्यायाधीश गोलाम मु्र्तुझा मोझुमदार यांनी निकाल वाचून दाखवताच एकच जल्लोष करण्यात आला. “मानवतेच्या विरोधात गुन्ह्यांचा भाग असलेले सर्व घटक आढळून आले आहेत” असे त्यांनी मृत्युदंडाची शिक्षा जाहीर करताना सांगितले.

हा निकाल नॅशनल टीव्हीवर थेट प्रसारित करण्यात आला आहे. हसीना यांच्या पदावरून हटवल्यानंतर बांग्लादेशात पहिली निवडणूक होण्याच्या काही महिने आधी हा निकाल जाहीर करण्यात आला. बांगलादेशात ही निवडणूक आता फेब्रुवारी २०२६ मध्ये नियोजित आहे.

हसिना नेमकं काय म्हणाल्या?

हसीना यांच्याकडून याआधी जारी करण्यात आलेल्या निवेदनात जोर देत सांगितले होते की, या ट्रिब्यूनलकडे वैधता आणि योग्य प्रक्रिया नाही.

  • हसीना म्हणाल्या की , “न्यायालयात माझा बचाव करण्याची कोणतीही न्याय संधी देण्यात आली नाही.”
  • तसेच हसीना यांनी न्यायाधीशांवर “पक्षपाती आणि राजकीय हेतूने प्रेरित” निर्णय दिल्याचा आरोप केला.
  • हसीना यांनी असाही आरोप केला की, ट्रिब्यूनल हे छेडछाड केलेले आणि कोणताही लोकशाही जनादेश नसलेल्या तसेच निवडून न आलेल्या सरकारद्वारे स्थापन आणि अध्यक्षता भूषवलेले होते.
  • तसेच त्यांनी स्पष्ट केले की, “योग्य ट्रिब्युनल जेथे पुराव्यांना महत्व असेल आणि त्यांची न्याय पद्धतीने तपासणी केली जाईल, तर त्यामध्ये मी माझ्यावर आरोप करणांना सामोरे जाण्यास घाबरत नाहीत.”

सुनावणीसाठी हजर राहण्याकरिता बांगलादेशात परत येण्याचे न्यायालयाने आदेश दिलेले असूनदेखील हसीना यांनी परतण्यास नकार दिला होता.