राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची सूचना
डॉक्टरांनी पदवीदान समारंभात ग्रीक हिप्पोक्रॅटिक शपथेऐवजी चरक संहितेतील शपथ घ्यावी, अशी सूचना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) केली आहे. ७ फेब्रुवारी रोजी देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांशी झालेल्या चर्चेदरम्यान ही सूचना करण्यात आली होती.
तथापि, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ‘एनएमसी’च्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा व्ही. वाणीकर यांनी सांगितले की, डॉक्टरांनी घ्यावयाच्या शपथेत बदल करण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
‘‘हिप्पोक्रॅटिक शपथ घेतली जाणार नाही, तर डॉक्टरांच्या पदवीदान समारंभात महर्षि चरक शपथ घेतली जाईल, असे ‘एनएमसी’च्या संकेतस्थळावरील वैद्यकीय महाविद्यालयांशी झालेल्या चर्चेच्या इतिवृत्तात म्हटले आहे.
चरक संहिता हा आयुर्वेदावरील प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे. महर्षि चरक शपथेचा उल्लेख चरक संहितेत आहे. ‘एम्स’ या देशातील प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थेतील पदवीधर गेल्या काही काळापासून वार्षिक दीक्षांत समारंभात ‘चरक शपथ’ घेत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. ‘‘स्वत:साठी नाही; कोणत्याही ऐहिक, भौतिक इच्छा किंवा लाभाच्या पूर्ततेसाठी नाही, तर केवळ दु:खी मानवतेच्या कल्याणासाठी, मी माझ्या रुग्णावर उपचार करीन आणि उत्तम वर्तन करेन,’’ ही चरक शपथ ‘एम्स’मध्ये घेण्यात येते.
‘हिप्पोक्रॅटिक शपथ’ ही वैद्यकीय नीतिमूल्यांच्या पालनाबाबतची पारंपरिक शपथ आहे. तिचे शब्द ग्रीक वैद्यकीय ग्रंथातून घेण्यात आले आहेत. ‘‘मी अपोलो फिजिशियन, एस्क्लेपियस, हायजिआ, पॅनेसिया आणि सर्व देवदेवतांची शपथ घेतो. त्यांच्या साक्षीने मी माझ्या क्षमतेनुसार या शपथेचे पालन करीन,’’ असे या शपथेत म्हटले आहे.
मी २०१३ मध्ये एम्समध्ये संचालक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वीच संस्थेने वार्षिक दीक्षांत समारंभात ‘चरक शपथ’ स्वीकारली होती. – डॉ. एम. सी. मिश्रा, माजी संचालक, एम्स