पासपोर्ट, रेल्वे तिकिटे याप्रमाणे आता तुम्हाला विवाह प्रमाणपत्र तात्काळ सेवेत २४ तासात मिळणार आहे.  दिल्ली सरकारने ही सेवा दिली असून एका दिवसात विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. २२ एप्रिलला ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून १० हजार रुपये भरल्यास विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र २४ तासात मिळते.
सर्वोच्च न्यायालयाने २००६ मध्ये दिल्ली सरकारला असा आदेश दिला होता की, विवाह झाल्यानंतर ६० दिवसात विवाह नोंदणी पत्र घेणे बंधनकारक आहे त्याचे पालन करताना तत्काळ सेवा सुरू  करण्यात आली असून जे लोक विवाह नोंदणी प्रमाणपत्र मागतील त्यांना ते दिले जातील असे महसूल सचिव धर्मपाल यांनी सांगितले.हिंदू विवाह कायद्यानुसार नोंदणीला १०० रुपये व विशेष विवाह नोंदणी कायद्यानुसार १५० रुपये व प्रतिज्ञापत्राचे ४००-५०० रुपये खर्च येतो. उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत विवाह नोंदणीचे अधिकार देण्याचा विचार आहे सध्या अतिरिक्त दंडाधिकाऱ्यांना विवाह नोंदणीचा अधिकार आहे असे त्यांनी सांगितले. दिल्ली सरकार एक पोर्टल सुरू करीत असून तेथे मोफत नोंदणी करून अर्ज करता येईल, तेथे अर्ज डाऊनलोड करता येतील.