बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या शक्तिशाली ‘तितली’ चक्रीवादळाने उग्र रूप धारण केलं असून ओडिशाच्या तटवर्तीय परिसरात हे वादळ धडकलं आहे.  मंगळवारपासून अत्यंत तीव्र झालेले हे चक्रीवादळ केव्हाही ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या सागरतटाला धडक देईल अशी शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवली होती.  ‘तितली’ चक्रीवादळ आज सकाळी साडेपाच ते साडेअकरा दरम्यान केव्हाही गोपाळपूरला पोहोचण्याची शक्यता होती, त्यानुसार सकाळी सव्वा सहाच्या सुमारास हे वादळ येथे धडकलं. चक्रीवादळाची परिस्थिती ओळखून जंगम जिल्हा प्रशासनाने गोपाळपूर भागातील घरे रिकामी केली आहेत. ओडिशामध्ये चार जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. ओडिशातून आतापर्यंत जवळपास 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.


या चक्रीवादळामुळे तटवर्ती भागात सोसाट्याचे वारे वाहत असून मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळामुळे ओडिशा तसेच आंध्र प्रदेशच्या किनारी भागात ताशी 140 ते 150 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून वाऱ्यांचा वेग ताशी 165 किमीपर्यंत जाण्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हे चक्रिवादळ आणखी अक्राळ-विक्राळ रूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ओडिशामध्ये चार जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे. ओडिशातून आतापर्यंत जवळपास 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. ओडिशा सरकारने किनारपट्टीवरील पाच जिल्ह्यांतील नागरिकांची घरं रिकामी करण्याचं काम सुरू केलं आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी परिस्थितीची माहिती घेतली असून त्यांनी गंजम, पुरी, खुर्दा, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या जिल्ह्यातील कलेक्टरांना तटवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची घरं तातडीने रिकामी करण्यास सांगितलं आहे. तसेच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी निवारागृहे उभारण्यास सांगण्यात आले आहे.

सुरूवातीला 10 कि.मी. प्रतितास वेगानं पुढे सकरणाऱ्या या वादळाने बंगालच्या खाडीत अचानक निर्माण झालेल्या वातारणामुळे महाकाय रूप धारण केलं. चक्रीवादळाचा फटका जास्त बसण्याची शक्यता असलेल्या परिसरांमध्ये एनडीआरएफची पथकं आधीच तैनात करण्यात आली आहेत, अद्याप लष्कराकडे मदत मागितलेली नाही. पण आवश्यकता पडल्यास लष्कराकडे मदत मागितली जाईल. पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्याता असल्यामुळे 11 ऑक्टोबरपर्यंत ओडिशा सरकारने विशेष व्यवस्था केली असल्याची माहिती मुख्य सचिव ए.पी.पाधी यांनी दिली.