आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले इंधनाचे दर आणि डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया यांच्या एकत्रित परिणामस्वरूप देशांतर्गत तेल उत्पादक कंपन्यांनी शुक्रवारी अचानक पेट्रोलच्या किमतीत लिटरमागे एक रुपया ४० पैशांनी वाढ केली. रातोरात ही दरवाढ लागू झाली आहे. पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे, हे विशेष.
 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरला असल्याने पेट्रोलच्या किंमतीत वाढ करणे अपरिहार्य ठरत असल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनतर्फे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. ही दरवाढ स्थानिक कर किंवा मूल्यवर्धित कर (व्हॅट) वगळून असल्याने पेट्रोलच्या किंमती त्या त्या भागातील स्थानिक कर अथवा व्हॅटनुसार वाढलेल्या असतील. याआधी १६ फेब्रुवारीला पेट्रोलच्या किंमतीत दीड रुपयाने वाढ झाली होती. विद्यमान दरवाढीमुळे मुंबईत आता पेट्रोल प्रतिलिटर ७७ रुपये ६६ पैसे झाले आहे.