अंतराळयानाची प्रकाशवर्षे दूर जाण्याची दमछाक थांबवून त्याला विश्रांती देऊन पुढचा पल्ला अधिक जोमाने गाठण्यासाठी अंतराळातच एखादा विश्रामअड्डा तयार करण्याच्या दिशेने मानवाचे पहिले पाऊल पडले आहे. त्यामुळे अवकाशातील एखादा वजनदार पदार्थ हलवून त्याचा हवा तसा उपयोग करणे शक्य होणार आहे. नासाच्या वैज्ञानिकांनी पाच लाख किलो वजनाचा लघुग्रह पकडून त्याचे स्थान हवे तसे बदलून अंतराळ स्थानकात रूपांतर करण्याची महत्त्वाकांक्षी योजना तयार केली आहे.
व्हाइट हाउसच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने २.६ अब्ज डॉलरची ही योजना आखली असून त्यावर विचार करण्यात येणार आहे. पुढील दशकासाठी अवकाश कार्यक्रमात याचा समावेश करण्याचा त्यांचा विचार आहे. नासा व कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे ‘कालटेक’ या संस्थांच्या वैज्ञानिकांनी या मोहिमेचा व्यवहार्यता अहवाल तयार केला आहे. मंगळावर पाठवल्या जाणाऱ्या मोहिमांसाठी मधला थांबा म्हणून अवकाश स्थानकाचा उपयोग करता येणार आहे.
लघुग्रहावरील नैसर्गिक साधनांचा वापर करण्याची कल्पना शेकडो वर्षांपूर्वीची आहे, परंतु ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आता उपलब्ध झाल्याचे ‘डेली मेल’ने म्हटले आहे. नासाने याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला असून त्याबाबत व्हाइट हाउसशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. येत्या दहा ते बारा वर्षांत अशा प्रकारे लघुग्रह पकडून तो हवा तेथे स्थापित करून त्याचे रूपांतर अंतराळ स्थानकात करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान परिपक्व अवस्थेत आणता येईल असे त्यांचे म्हणणे आहे.
नासाची महत्त्वाकांक्षी योजना
योजना काय?
लघुग्रह पकडण्यासाठी कॅप्सूल म्हणजे कुपीचा वापर केला जाणार असून ती अॅटलास-५ अग्निबाणाला जोडली जाणार आहे. लघुग्रहाच्या जवळ गेल्यानंतर पन्नास फुटांची ही बॅग उघडली जाणार असून ती खडकाच्या रूपातील लघुग्रहाशी जोडली जाणार आहे. त्यानंतर थ्रस्टर्स चालू करून ३०० किलो इंधनाच्या मदतीने लघुग्रहाची गती थांबवली जाईल व तो गुरुत्वीयदृष्टय़ा निष्प्रभ ठिकाणी आणला जाणार आहे. तेथे त्याचा वापर अवकाशस्थानक म्हणून केला जाणार आहे. लघुग्रह हे पृथ्वीवर आपटून धोकादायक ठरू शकतात, त्यापेक्षा असे जवळ आलेले खडकाच्या रूपातील लघुग्रह पकडून त्यांचे रूपांतर अंतराळ स्थानकात करता येईल असे वैज्ञानिकांना वाटते, लघुग्रह पकडून त्याचा वापर मंगळासारख्या लांबच्या मोहिमांसाठी करता येऊ शकतो.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2012 रोजी प्रकाशित
लघुग्रह बनणार अंतराळ संशोधनगृह!
अंतराळयानाची प्रकाशवर्षे दूर जाण्याची दमछाक थांबवून त्याला विश्रांती देऊन पुढचा पल्ला अधिक जोमाने गाठण्यासाठी अंतराळातच एखादा विश्रामअड्डा तयार करण्याच्या दिशेने मानवाचे पहिले पाऊल पडले आहे. त्यामुळे अवकाशातील एखादा वजनदार पदार्थ हलवून त्याचा हवा तसा उपयोग करणे शक्य होणार आहे.

First published on: 25-12-2012 at 04:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On small planet will now going to make reserch center