भरधाव वेगाने धावणाऱ्या ऑडी कारने रस्त्यावरील दुचाकीस्वारांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. राजस्थानच्या जोधपूरमध्ये ही घटना घडली आहे. ही धक्कादायक दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडीओत ऑडीने धडक दिल्यानंतर दुचाकी अक्षरश: हवेत उडताना दिसत होत्या. सुरुवातीला नियंत्रणात असणारी ऑडी कार अचानक वेग होते आणि समोर असणाऱ्या दुचाकींना धडक देते. यानंतर अनियंत्रित झालेली ऑडी रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या एका झोपडीला धडक देते आणि थांबते. मात्र ऑडीचा वेग इतका होता की दुचाकीस्वार गाडीसहीत हवेत फेकले गेले होते.

काही सेकंदात झालेल्या या दुर्घटनेत ऑडी कारने एकाहून अधिक दुचाकींना धडक दिली. वर्दळीचा भाग असलेल्या या ठिकाणी रस्त्याशेजारी झोपड्या आणि फेरीवाले होते. कारने दुचाकींसहित इतर काही जणांनाही धडक दिल्याचं व्हिडीओत दिसत आहे. कार अनियंत्रित झाल्याचं पाहिल्यानंतर काहींनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातीला काहींनाही कारने धडक दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींना जोधपूरमधील एम्स रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव मुकेश (३०) आहे. जखमी झालेल्यांपैकी चार जण दुचाकीस्वार असून तिघे झोपडीत राहणारे होते. अमित नागर असं ऑडीच्या चालकाचं नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत विमानतळावरुन थेट रुग्णालयात पोहोचले. जखमींना तात्काळ आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालया प्रशासनाला केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी मृत्यू झालेल्या मुकेश यांच्या कुटुंबीयांसाठी दोन लाख तर गंभीर जखमींना १ लाख आणि किरकोळ जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.