काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षारक्षकांना यश आले आहे. तर इतर दोन दहशतवाद्यांना जवानांनी ताब्यात घेतले आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. अजूनही या भागात चकमक सुरुच असून यामध्ये एक भारतीय जवानही जखमी झाला आहे.


चकमकीदरम्यान, सुरक्षा रक्षकांनी परिसरात शोध मोहिम सुरु केली असून दोन्ही बाजूने गोळीबार अद्याप सुरुच आहे. पुलवामातील संबुरा गावात काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षारक्षकांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

तत्त्पर्वी सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सने केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला. पाकिस्तानी रेंजर्सने बीएसएफच्या गस्त घालणाऱ्या पथकावर गोळीबार केला होता. या गोळीबारात बीएसएफचे कॉन्स्टेबल तपन मंडल गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. २५ वर्षीय जवान तपन मंडल हे पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या सतुई गावचे रहिवाशी होते.