काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारच्या ‘करोनानीती’वर आणि चीन संघर्षांच्या हाताळणीवर टीका केली आहे. बुधवारी त्यांनी वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांवरून मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला केला. केंद्र सरकारने इंधनाच्या दरांना ‘मुक्तद्वार’ करून दिले आहे, असे ट्वीट राहुल यांनी केले.
राहुल गांधी यांनी इंधनाच्या वाढत्या दराचा मुद्दा टाळेबंदीच्या परतीच्या प्रवासातील पहिल्या टप्प्याशी जोडलेला होता. टाळेबंदी शिथिल करून आर्थिक व्यवहारांना वेग देण्यात आला. त्यानंतर गेल्या १८ दिवसांमध्ये देशातील तेल उत्पादक कंपन्यांनी इंधन दरवाढ केली व आता बुधवारी डिझेल हे पेट्रोलपेक्षा महाग झाले आहे, असे ट्वीट केले आहे. बुधवारी पेट्रोलच्या दरात वाढ झाली नसली तरी डिझेलचे दर प्रति लिटर ४८ पैशांनी वाढले. त्यामुळे पेट्रोलचे दर दिल्लीत ७९.७६ रुपये तर डिझेलचे दर ७९.८८ रुपये झाले.
काँग्रेसचे आंदोलन
इंधनदरवाढीचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला असून २९ जून रोजी देशातील प्रत्येक जिल्हा मुख्यालयासमोर सकाळी १० ते १२ हे दोन तास धरणे आंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्यानंतर ३० जून ते ४ जुलै हे पाच दिवस तालुका स्तरावर धरणे धरले जाईल.