वझिरिस्तान आदिवासी पट्टय़ात गुरुवारी अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात मुल्लाह नझीर आणि त्याच्या साथीदारासह १० तालिबानी ठार झाले आहेत. वझिरिस्तानच्या दक्षिण भागातील अंगूर अड्डय़ावर सीआयएच्या टेहळणी करणाऱ्या विमानाने एका वाहनावर केलेल्या हल्ल्यात नझीरसह त्याचा साथीदार रत्ता खान आणि अन्य चार दहशतवादी ठार झाले. या हल्ल्यात पाक सरकार समर्थक नझीर ठार झाल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांचा हवाला देऊन सांगण्यात आले. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील दक्षिण वझिरिस्तान हा अल-कायदा, तालिबान आणि अन्य दहशतवादी संघटनांचा महत्त्वाचा तळ असून नझीर त्याचा मुख्य कमांडर होता. इतकेच नव्हे तर वझिरी जमातीमध्येही त्याचे वर्चस्व होते आणि अल-कायदाशी संबंधित हक्कानीशीही त्याचा जवळचा संबंध होता. पाकिस्तानी भूमीवर दहशतवादी कारवाया करणार नाही, असा शांतता करार पाकिस्तानच्या लष्कराशी नझीरने २००७ मध्ये केला होता.