भारत-पाकिस्तान सीमेवर व्यापाराच्या आडून अमली पदार्थाच्या तस्करी करणाऱ्या पाकिस्तानी ट्रक चालकावर केलेल्या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील थंडावलेल्या व्यापाराला पुन्हा सुरुवात होणार आहे. दोन्ही बाजूंनी वाटाघाटीद्वारे या मुद्दय़ावर तोडगा काढल्यामुळे तीन आठवडय़ानंतर एकमेकांचे सुमारे ७५ जप्त केलेले मालवाहू ट्रक सोडून देण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील ठप्प पडलेली सीमेवरील व्यापारी वाहतूक पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१७ जानेवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमधून माल घेऊन भारतीय हद्दीत आलेल्या ट्रकमध्ये लपवून ब्राऊन शुगरची ११४ पाकिटे आणण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १०० कोटी रुपये किंमत असलेली ही अमली पदार्थाची पाकिटे भारतीय सैन्याने जप्त करून ट्रक चालकाला अटक केली होती. भारताच्या या कारवाईचा निषेध करीत पाकिस्तानने तस्करीचा आरोप फेटाळला तसेच या कारवाईचा निषेध करीत भारतातून आलेले २७ मालवाहू ट्रक जप्त केले होते. तर भारतानेही पाकिस्तानचे ४८ ट्रक पकडून ठेवले होते. दोन्ही देशांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सीमेवरून होणारा व्यापार १८ जानेवारीपासून ठप्प पडला होता. भारताने कारवाई केलेला ट्रक सोडल्यानंतरच भारतीय मालवाहू वाहने सोडण्याची अट ठेवली होती. मात्र भारताने त्याला विरोध केला होता. त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली होती. या वादाचा सीमेवरील बसेसवरही झाला होता. अखेर दोन्ही देशांनी वाटाघाटीद्वारे हा तिढा सोडवण्यावर भर दिला. त्यानुसार पाकिस्तानने आपल्या ताब्यातील भारताचे २७ ट्रक सोडले तर भारताने पाकिस्तानचे ४८ मालवाहू ट्रक सोडले. मात्र अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चालकाची सुटका करण्याची मागणी मात्र भारताने मान्य केली नाही.