पाकिस्तानच्या क्वेटा या शहरात बुधवारी झालेल्या आत्मघाती स्फोटात किमान १५ जणांचा मृत्यू झाला असून दहाजण जखमी झाले आहेत. येथील एका पोलिओ लसीकरण केंद्राबाहेर हा स्फोट झाला. मृतांमध्ये बहुतांश सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. हा आत्मघाती हल्ला असल्याची माहिती बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर सरफराज बुगती यांनी दिली आहे. मृत पावलेल्या १५ जणांमध्ये १२ सुरक्षारक्षक, निमलष्करी दलाचा एक जवान आणि दोन नागरिकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींना क्वेटा जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या याठिकाणी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आज क्वेटा शहरासह बलुचिस्तान प्रांतामधील पोलिओ लसीकरण मोहीमेचा तिसरा दिवस होता. त्यावेळी हा प्रकार घडला. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये आजही पोलिओची समस्या गंभीर आहे. पोलिओच्या लसीमुळे वांझोटेपणा येतो या गैरसमजुतीमुळे पोलिओ लसीकरण केंद्रावर कट्टरपंथीयांकडून अधूनमधून हल्ले करण्यात येतात.
दरम्यान, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, या बॉम्बस्फोटानंतर घटनास्थळी गोळीबाराचे आवाजही ऐकू आले होते. हा स्फोट झाला तेव्हा याठिकाणी सुरक्षारक्षक आणि पोलिओ लसीकरण कर्मचारी मोठ्याप्रमाणावर हजर होते.