१४ वर्षीय मुलीला मासिक पाळी आली असल्याने शरियत कायद्यानुसार तिचा विवाह वैध असल्याचा निर्णय पाकिस्तान कोर्टाने दिला आहे. १४ वर्षीय ख्रिश्चन मुलीचं अपहरण करुन तिचं जबरदस्ती मुस्लीम व्यक्तीशी लग्न लावून देण्यात आलं होतं. तसंच तिचं धर्मांतरही करण्यात आलं होतं. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने निर्णय सुनावताना मुलीला मासिक पाळी आली असल्याने ती प्रौढ असून तिचा विवाह वैध असल्याचा निर्वाळा दिला. मुलीच्या पालकांनी आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

मुलीच्या पालकांनी केलेल्या दाव्यानुसार, ऑक्टोबर महिन्यात त्यांची मुलगी हुमा हिचं अपहरण करुन धर्मांतर करत अपहरणकर्ता अब्दुल जब्बार याच्याशी लग्न लावून देण्यात आलं होतं. मुलीच्या वकील तबस्सुम युसुफ यांनी सांगितल्यानुसार, सिंध उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहोत. न्यायालयाने निर्णय देताना सांगितलं की, जरी मुलगी अल्पवयीन असल्याचं सिद्ध झालं असलं तरी तिला मासिक पाळी येऊन गेली असल्याने तिचं लग्न शरियत कायद्यानुसार वैध आहे.

याआधी जेव्हा मुलीच्या पालकांनी न्यायालयात धाव घेतली होती तेव्हा न्यायालयाने मुलीचं वय जाणून घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश दिला होता. तबस्सुम यांनी न्यायालयाचा निर्णय बालविवाह कायद्याच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. सिंध प्रांतातील आणि खासकरुन हिंदू आणि ख्रिश्चन समाजातील बालविवाह रोखण्यासाटी हा कायदा करण्यात आला होता. दरम्यान मुलीच्या पालकांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदत मागितली आहे.