पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन करण्याची तयारी केली आहे. लवकरच इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतील. पण सध्या पाकिस्तानमधील ‘चायवाला’ खासदार सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ‘चायवाला’ म्हणून लोकप्रिय झालेले गुल जफर खान कोट्यधीश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. गुल जफर खान खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एनए ४१ (बाजौर) येथून निवडून आले आहेत. गुल जफर खान यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या संपत्तीच्या विवरणाचा हवाला समोर देत एका पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. पाकिस्तानमधील नेटीझन्सनी अपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये काही जणांनी त्याच्यावर टीका केली तर काहीनी तटस्थ भूमिका घेतली आहे.
गुल जफर खान निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीमुळे तीन कोटींची समपत्ती असल्याचे नमूद केले होते. तसेच विवरणपत्रानुसार त्यांचा कपड्याचा व्यवसाय आहे. याशिवाय एक कोटींची अचल मालमत्ता, दोन घरे आणि एक कोटी २० लाख रुपये किमतीची शेतजमीन आहे. इम्रान खान यांच्या पक्षाकडून निवडणुकीचे तिकीट मिळण्यापूर्वी ते रावळपिंडीच्या एका हॉटेलमध्ये चहा बनवण्याचे काम करत होते, अशी चर्चा होती. निवडणूक प्रचाराच्या वेळी गुल जफर खान नागरिकांना चहा देत असल्याची छायाचित्र आणि व्हिडीओ सोशल मीडियवर व्हायरल झाली होती.