नरेंद्र मोदी सरकारने जम्मू काश्मीरसंबंधी ऐतिहासिक निर्णय घेत राज्याला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त ३७० कलम अंशत: हटवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत ही घोषणा केली. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. पाकिस्तानमधील शेअर बाजारात याचा परिणाम दिसला असून खूप मोठी घसरण झाली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदीय समितीची बैठक बोलावली आहे. दरम्यान पाकिस्तानने भारताला पोकळ धमकी दिली असून भारताने अत्यंत धोकादायक खेळी केली असून, याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असं म्हटलं आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद कुरैशी यांनी म्हटलं आहे की, “भारताने अत्यंत धोकादायक खेळी केली आहे. संपूर्ण क्षेत्रावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. इम्रान खान काश्मीर समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असताना भारत सरकारच्या या निर्णयाने समस्येचा गुंता वाढवला आहे. आता काश्मिरींवर पहिल्यांपेक्षा अधिक कडक पहारा लावण्यात आला आहे. आम्ही यासंबंधी संयुक्त राष्ट्राला सांगितलं आहे. इस्लामिक देशांनाही आम्ही याची माहिती दिली आहे”.

भारत सरकारने एकतर्फी निर्णय घेतल्याचं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. भारताच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पाकिस्तान शक्य ते सर्व पर्याय वापरणार आहे. “काश्मीर एक आंतरराष्ट्रीय वादग्रस्त क्षेत्र आहे. भारताचा कोणताही निर्णय काश्मीरमधील वादग्रस्त परिस्थिती बदलू शकत नाही. हा निर्णय पाकिस्तान आणि काश्मीरमधील लोक कधीच मान्य करणार नाही. पाकिस्तान काश्मिरींना आपलं समर्थन देणं सुरु ठेवणार आहे. सर्व मुस्लिमांनी मिळून काश्मीरच्या भल्यासाठी प्रार्थना करा”, असं आवाहन पाकिस्तानने केलं आहे.

पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी भारत सरकारचा निर्णय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. काश्मिरी जनतेच्या विरोधात हा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पाकिस्तान नेहमीच काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार या प्रश्नावर शांततेने तोडगा काढण्यावर जोर दिला असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दुसरीकडे पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पार्टीचे अध्यक्ष तसंच विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. “भारताचा हा निर्णय स्वीकारला जाऊ शकत नसून यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढेल”, असं त्यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.